हे षड्यंत्र दीड वर्षांपासूनचे; अनेक व्हिडीओ उघड करण्याचा नितीन देशमुखांचा इशारा

आपल्याविरोधात सक्तवसुली संचलनालयाची (ईडी) चौकशी लावायला हवी. ईडीची चौकशी लावली तर समाजात माझी इज्जत वाढली असती. माझ्या मुलाला चांगले स्थळ येईल, असा टोलाही नितीन देशमुख यांनी लगावला आहे.

    अकोला : शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख (Mla Nitin Deshmukh) यांनी शिंदे गटावर गंभीर आरोप केला आहे. सूरत (Surat) आणि गुवाहाटीमधील (Guwahati) अनेक व्हिडीओ आपल्याकडे आहेत, असा सूचक इशारा त्यांनी दिला आहे. नितीन देशमुख हे एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासोबत सुरतला गेले होते; मात्र, नंतर ते तेथून परत आले. अकोल्यात (Akola) शिवसैनिकांच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी शिंदे गटासोबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनाही लक्ष्य केले.

    माझ्याविरोधात पाच दिवसांपूर्वी लाचलुपत विभागाची चौकशी लावण्यात आली. पोलीस महानिरीक्षकांनी तुमचे काही असेल तर वर जाऊन भेटा असे सांगितले. आपल्याविरोधात सक्तवसुली संचलनालयाची (ED) चौकशी लावायला हवी. ईडीची चौकशी लावली तर समाजात माझी इज्जत वाढली असती. माझ्या मुलाला चांगले स्थळ येईल, असा टोलाही नितीन देशमुख यांनी लगावला आहे.

    माझ्याविरोधात कारवाई केली, तर अनेक व्हिडीओ आहेत, ते उघड करेन. शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांचे, सत्तांतर घडवणाऱ्यांचे व्हिडीओ माझ्याकडे आहेत. पैशाने सत्तांतर झाले आहे, हे सिद्ध करेन. मी हे सिद्ध करू शकलो नाही, तर महाराष्ट्राच्या विधानसभेत आत्महत्या करेन, असा इशाराही त्यांनी दिला. ५० खोके एकदम ओकेचे षड्यंत्र गेल्या दीड वर्षांपासून सुरू असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.