मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या खासदार उदयनराजेंना शुभेच्छा; मराठा आरक्षणाचे दिले आश्वासन

खासदार उदयनराजे भोसले यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जलमंदिर येथे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना मराठा बांधवांना देण्यात आलेले आरक्षण हे कोणावरही अन्याय न करणारे असून न्यायालयांमध्ये कायद्याच्या निकषावर टिकणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.

    सातारा : खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जलमंदिर येथे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना मराठा बांधवांना देण्यात आलेले आरक्षण हे कोणावरही अन्याय न करणारे असून न्यायालयांमध्ये कायद्याच्या निकषावर टिकणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. साताऱ्यामध्ये माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री शिंदे यांनी राठा समाजाने आरक्षणाच्या मुद्द्यावर संयम बाळगावा असे आवाहन केले.

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी महाबळेश्वरच्या दौऱ्यावर होते.यावेळी त्यांनी साताऱ्यामध्ये जलमंदिर येथे येऊन खासदार उदयनराजे भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मराठा आरक्षणावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,  काही लोक म्हणतात दिलेले आरक्षण टिकणार नाही,परंतु ते टिकावे यासाठी दोन्ही बाजूने सकारात्मक चर्चा होणे गरजेचे आहे. त्यावेळी ज्यांना संधी होती तेव्हा त्यांनी त्याचे सोने केले नाही. आम्ही कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही याची काळजी घेऊनच मराठा समाजाला आरक्षण दिले आहे.असे स्पष्ट मत मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केले.

    सगेसोयरे या शब्दाला ग्राह्य धरूनच मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यात यावे यासाठी मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केले आहे. याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, मराठा समाजाने आरक्षणाच्या विषयावर जरा संयमाने घ्यावे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी खासदार उदयनराजे भोसले हे आग्रही आहेत. आम्ही सुद्धा त्याचा सकारात्मकरित्या विचार करून विशेष अधिवेशनाद्वारे मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. काही कायदेशीर बाबींचा विचार करूनच त्याची मांडणी व्हावी लागते असे मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

    जलमंदिर येथे भवानी मातेचे दर्शन घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना शुभेच्छा दिल्या . यावेळी राजमाता कल्पनाराजे भोसले, दमयंती राजे भोसले, राज्याचे उत्पादन शुल्क तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, कोरेगावचे आमदार महेश शिंदे, उदयनराजे समर्थक व लोकसभा संयोजक सुनील काटकर, काका धुमाळ, रंजना रावत गीतांजली कदम ,अश्विनी पुजारी, सुजाता राजे महाडिक, पोलीस अधीक्षक समीर शेख, अधि स्वीकृती समिती अध्यक्ष हरीश पाटणे, चंद्रकांत पाटील इत्यादी यावेळी उपस्थित होते.  मुख्यमंत्र्यांनी उदयनराजे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. उदयनराजे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना शिवप्रतिमा भेट दिली.