prithviraj chavan and sharad pawar

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये पुण्यातील बैठकीवरुन सध्या राजकारण चांगलंच तापलं असून या भेटीचे तर्क वितर्क लढविले जात आहे. अशातच आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक मोठा दावा केला आहे.

    मुंबई: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये पुण्यातील बैठकीवरुन सध्या राजकारण चांगलंच तापलं असून या भेटीचे तर्क वितर्क लढविले जात आहे. अशातच आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक मोठा दावा केला आहे. शरद पवारांनी भाजपसोबत यावं, त्यांना केंद्रात कृषीमंत्रीपद आणि निती आयोगाचे अध्यक्षपद देण्यात येईल अशी ऑफर भाजपने त्यांना दिल्याचा दावा चव्हाण यांनी केला आहे. पण शरद पवारांनी ही ऑफर नाकारली असल्याचंही ते म्हणाले. एका इंग्रजी वृत्तपत्रामध्ये याबाबतचे वृत्त प्रसारित झालं आहे.

    पृथ्वीराज चव्हाण हे अजित पवार आणि शरद पवार यांच्या झालेल्या भेटीवर बोलताना म्हणाले की, अजित पवार भाजपसोबत सत्तेस सामील झाल्यानंतर शरद पवारही त्यांच्यासोबत येतील अशी शक्यता भाजपला वाटत होती. पण अजूनपर्यंत तरी तसं काही घडलं नाही. त्यामुळे केंद्रातील भाजपच्या सत्तेमध्ये सामील होण्यासाठी शरद पवारांना दोन मोठ्या ऑफर देण्यात आल्या आहेत. केंद्रीत कृषीमंत्रीपद आणि निती आयोगाच्या अध्यक्षपदाची ऑफर त्यांना देण्यात आली आहे. अजित पवारांनी पुण्यात शरद पवारांची चोरडिया यांच्या निवासस्थानी घेतलेल्या या भेटीत या ऑफरबद्दल चर्चा झाल्याची माहिती आहे. पण शरद पवारांनी भाजपची ही ऑफर नाकारली.

    सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनाही ऑफर

    पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, शरद पवारांनी भाजपसोबत यावं यासाठी खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार जयंत पाटील यांनाही ऑफर देण्यात आली आहे. याबाबत अजित पवारांनी दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन चर्चा केल्याची माहिती आहे.

    माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या आधीही शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीवर भाष्य केलं होतं. शरद पवार-अजित पवार यांच्या पुण्यातील भेटीमुळे महाविकास आघाडीमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये संदिग्धता आहे. त्यामुळे ही संदिग्धता स्वतः शरद पवारांनी दूर करावी, या भेटीबद्दल त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना माहिती द्यावी असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते.