‘हा तर फक्त ट्रेलर होता, वेळ आली तर पिक्चर पण दाखवू’ ;  टोल फोडणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यांचा अमित ठाकरेंच्या हस्ते सत्कार

मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्यादरम्यान सिन्नर येथील टोल नाक्यावर गाडी अडवल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर त्यांच्यासोबत असलेल्या संतप्त मनसैनिकांनी तेथील टोलनाकाच फोडला होता. या घटनेनंतर राज्याच्या राजकारणात चांगलीच चर्चा झाली होती.

  मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्यादरम्यान सिन्नर येथील टोल नाक्यावर गाडी अडवल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर त्यांच्यासोबत असलेल्या संतप्त मनसैनिकांनी तेथील टोलनाकाच फोडला होता. या घटनेनंतर राज्याच्या राजकारणात चांगलीच चर्चा झाली होती.तोडफोडप्रकरणी मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपींना आज जामीन मंजूर करण्यात आला. हा जामीन मंजूर झाल्यानंतर अमित ठाकरे यांच्या हस्ते टोल फोडणाऱ्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

  नेमके काय घडले होते?

  नाशिक दौऱ्यादरम्यान मनसे नेते अमित ठाकरे यांचा ताफा थांबवल्याने संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी समृद्धी महामार्गावर असलेल्या सिन्नर येथील टोलनाक्यावर तोडफोड केली होती. या प्रकरणी मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या सर्व संशयित आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला. या सर्व कार्यकर्त्यांचा अमित ठाकरे सत्कार करण्यात आला. यासाठी अमित ठाकरे पुन्हा नाशिक दौऱ्यावर आले होते. यावेळी केक कापून मनसे कार्यकर्त्यांचा सत्कार केला. विशेष म्हणजे या केकवर ‘हा तर फक्त ट्रेलर होता, वेळ आली तर पिक्चर पण दाखवू.. असे लिहल्याचे दिसले.

  काय म्हणाले अमित ठाकरे?

  यावेळी बोलताना अमित ठाकरे यांनी जे घडलं ते मुद्दाम घडवलेलं नाही. ते घडलं ते अनाकलनीय घडले असल्याची प्रतिक्रिया दिली. तसेच प्रेमापोटी कार्यकर्त्यांना भेटायला आलो, त्यांचे कौतुक करायला आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी भाजपच्या टीकेलाही जोरदार प्रत्यूत्तर दिले. भाजपच्या टिकेला मी भीक घालत नाही.. असे म्हणत त्यांनी एकदा राज साहेब यांच्यावर विश्वास ठेवा, संधी द्या.. असे आवाहनही त्यांनी दिले.