कल्याणमधील गुडीपाडवा धुमधडाक्यात! हिंदू नववर्ष स्वागतयात्रेचा रौप्य महोत्सव

हिंदू नववर्ष स्वागतयात्रेचे यंदा रौप्य महोत्सवी 25 वे वर्ष असून इंडीयन मेडीकल असोसिएशन कल्याणकडे आयोजनपद देण्यात आले आहे.

    कल्याणमध्ये गुढीपाडव्यानिमित्त काढण्यात येणाऱ्या हिंदू नववर्ष स्वागतयात्रेचे यंदा रौप्य महोत्सवी 25 वे वर्ष असून इंडीयन मेडीकल असोसिएशन कल्याणकडे आयोजनपद देण्यात आले आहे. “जयघोष हिंदुत्वाचा – जल्लोष कल्याणकरांचा” या ब्रीद वाक्याखाली ही स्वागतयात्रा काढण्यात येणार आहे. या स्वागत यात्रेत 25 हजार नागरिक सहभागी होतील असा विश्वास आयोजक इंडीयन मेडीकल असोसिएशनच्या डॉ. प्रशांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

    या रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागतयात्रेमध्ये कल्याणकरांचा सहभाग वाढविण्यासाठी आयएमए कल्याणकडून गेले वर्षभरापासून विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. यंदाच्या रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागतयात्रेच्या कार्यक्रमांची सुरुवात ६ एप्रिलपासून केली जाणार आहे. ६ एप्रिल रोजी कल्याणच्या ऐतिहासिक भगवा तलाव येथील श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामांची आरती सोहळा, ७ एप्रिल रोजी कल्याण पश्चिमेत ठिकठिकाणी स्वच्छता अभियान, ८ एप्रिल रोजी वासुदेव बळवंत फडके मैदानात सांगीतिक कार्यक्रम होणार असून महाराष्ट्राच्या कलाविश्वात नावलौकिक मिळवलेल्या कल्याणातील गायक नचिकेत लेले, डॉ. संकेत भोसले, कोरिओग्राफर आशिष पाटील, कलाकार आदिती सारंगधर हे युवा कलाकार त्यात सहभागी होणार असल्याची माहिती स्वागतयात्रेचे समन्वयक आयएमएचे डॉ. प्रशांत पाटील यांनी दिली. तर रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागतयात्रेनिमित्त फडके मैदानात २५ फुटांची भव्य गुढीही उभारण्यात येणार आहे.

    “जयघोष हिंदुत्वाचा – जल्लोष कल्याणकरांचा” या ब्रीद वाक्याखाली ही स्वागतयात्रा काढण्यात येईल. ही रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागतयात्रा असल्याने त्यामध्ये कल्याणातील प्रत्येक नागरिक आणि प्रत्येक सामाजिक संस्थेला सहभागी करून घेण्यात आले आहे. त्यामुळे यामध्ये मराठी बांधवांसोबत गुजराथी, मारवाडी, पंजाबी, उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय अशा सर्वच प्रांतातील समाज बांधव पारंपरिक स्वरूपात सहभाग घेणार आहेत.

    मुख्य स्वागतयात्रा ही नेहमीप्रमाणे मुरबाड रोड येथून सकाळी ६.३० वाजता निघून कमिश्नर बंगला, रामबाग, सहजानंद चौक, छ्त्रपती शिवाजी महाराज चौक, केडीएमसी, देवी अहिल्याबाई चौक, लोकमान्य टिळक चौक, पारनाका, लालचौकीमार्गे वासुदेव बळवंत फडके मैदानात पोहोचेल. तर नविन कल्याण अशी ओळख असणाऱ्या साईचौक खडकपाडा आणि स्व. विशाल भोईर चौक उंबर्डे परिसरातून दोन नव्या उपयात्रा फडके मैदानात पारंपरिक यात्रेमध्ये जोडल्या जाणार असल्याचेही डॉ. प्रशांत पाटील यांनी सांगितले.