Diwali 2023 Pune Fire

  पुणे : लक्ष्मीपूजनानंतर रविवारी सायंकाळी शहर, तसेच उपनगरात मोठ्या प्रमाणावर आतषबाजी करण्यात आली. फटाक्यांमुळे वेगवेगळ्या भागात १५ ठिकाणी आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आग आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला.

  शहरात मोठ्या प्रमाणावर आतषबाजी
  लक्ष्मीपुजनाच्या दिवशी शहरात मोठ्या प्रमाणावर आतषबाजी करण्यात येते. रविवारी सायंकाळी साडेसातनंतर व्यापारी पेठेसह शहरातील वेगवेगळ्या भागात मोठ्या प्रमाणावर आतषबाजी करण्यात आली. लक्ष्मीपुजनाच्या दिवशी घराच्या छतावर साठलेला पाचोळा, तसेच झाडांना आग लागण्याच्या घटना घडतात. अग्निशमन दलाच्या मुख्य केंद्रातील नियंत्रण कक्षात नागरिकांनी आग लागल्याच्या तक्रारी नोंदविल्या. रविवारी सायंकाळी साडेसात ते रात्री दहापर्यंत १५ ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या, अशी माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांनी दिली.
  या ठिकाणी लागली आग
  रास्ता पेठेतील के.ई.एम रुग्णालय, कोथरुडमधील सुतार दवाखान्याजवळ एका दुकानात आग लागली. वडारवाडी परिसरातील पांडवनगर पोलीस चौकी परिसरातील एका घरात आग लागल्याची घटना घडली. कोंढवा बुद्रुक पोलीस चौकीसमोर साठलेल्या कचऱ्यावर ठिणगी पडून आग लागली. नाना पेठेतील चाचा हलवाई दुकानाजवळ एका इमारतीत दहाव्या मजल्यावरील सदनिकेत आग लागली.
  शिवनेरी परिसरातील घराच्या गच्चीवर आग
  कोंंढव्यातील शिवनेरी परिसरातील घराच्या गच्चीवर आग लागली. वारजे भागातील आदित्य गार्डन सिटी सोसायटीतील सदनिकेत आग लागली. शुक्रवार पेठ पोलीस चौकीसमाेरील एका घरात आग लागली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात एकापाठोपाठ दूरध्वनी आल्याने अग्निशमन दलाच्या जवानांची धावपळ उडाली.

  पिंपरी शहरातसुद्धा आगीच्या घटना

  पिंपरी चिंचवड शहरात रविवारी (दि. 12) लक्ष्मी पूजन उत्साहात पार पडले. मात्र याच दिवशी शहरात ठिकठिकाणीआगीच्या 17 घटना घडल्या. 12 ठिकाणी घरांना आग लागली. तीन ठिकाणी दुकानांना तर एका कंपनीत आग लागली. तसेच याचदिवशी एका झाडाला देखील आग लागली. तर दिवसा दोन आगीच्या आणि एक ऑईल सांडल्याची घटना घडली. एका दिवसातठिकठिकाणी लागलेल्या आगीमुळे अग्निशमन विभागाची चांगलीच धावपळ झाली.

   

   

   

  वेळ आणि आगीची घटना घडलेली ठिकाणे

  रात्री 8.20 – जुनी सांगवी पवार नगर (घराला आग)

  रात्री 8.25 – पी के स्कूल जवळ, पिंपळे सौदागर (घराला आग)

  रात्री 8.54 – सुदर्शन कॉलनी, वाकड (घराला आग)

  रात्री 8.56 – सी एन जी पंपाजवळ, फुगेवाडी (घराला आग)

  रात्री 9.13 – सरिता गार्डन जवळ, कासारवाडी (घराला आग)

  रात्री 9.32 – पीसीएमसी चौक, भोसरी (घराला आग)

  रात्री 9.49 – रावेत चौक, पुनावळे (दुकानाला आग)

  रात्री 9.53 – फोर के पॅलेस, चिखली (घराला आग)

  रात्री 10.00 – विजडम हायस्कूल जवळ, काळेवाडी (घराला आग)

  रात्री 10.48 – साई मंदिर जवळ, वडमुखवाडी (सलून दुकानाला आग)

  रात्री 10.49 – साई पूजा बाग, दत्तवाडी आकुर्डी (घराला आग)

  रात्री 11.23 – एम्पायर इस्टेट, चिंचवड (घराला आग)

  रात्री 11.26 – कुणाल आयकॉन, पिंपळे सौदागर (झाडाला आग)

  रात्री 11.38 – करिश्मा हेरिटेज, मोरवाडी (घराला आग)

  मध्यरात्री 12.28 – बोऱ्हाडेवाडी, मोशी(कंपनीला आग)

  मध्यरात्री 12.36 – पिंपरी मार्केट (कपड्याच्या दुकानाला आग)

  पहाटे 3.32 – मारुती मंदिर जवळ, दापोडी गावठाण (घराला आग)

  याशिवाय रविवारी सकाळी 10.35 वाजता सयाजी हॉटेल समोर रस्त्यावर ऑईल सांडल्याची वर्दी होती. त्यानंतर दुपारी 1.25 वाजताएच ए मैदान पिंपरी येथे गवताला आग लागली. दुपारी 2.16 वाजता अण्णासाहेब मगर स्टेडियम, पिंपरी येथे कचऱ्याला आग लागली होती.