यंदा साखरेच्या उताऱ्यात घट; 180 कारखान्यांकडून 16 लाख टन साखरेचे उत्पादन

राज्यातील यावर्षीच्या हंगामाला सव्वा महिन्यांचा काळ उलटला असून, १८० कारखान्यांनी आतापर्यंत १६ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. मात्र यावर्षी साखर उताऱ्यात सुमारे एक टक्क्याची घट झाली आहे.

  पुणे : राज्यातील यावर्षीच्या हंगामाला सव्वा महिन्यांचा काळ उलटला असून, १८० कारखान्यांनी आतापर्यंत १६ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. मात्र यावर्षी साखर उताऱ्यात सुमारे एक टक्क्याची घट झाली आहे. पावसाने ओढ दिल्याने यंदा ही घट झाली आहे. गाळपास ऊस कमी असल्याने हंगाम आणखी दोन ते अडीच महिनेच सुरू राहील, असा अंदाज आहे.

  राज्यात एक नोव्हेंबरला ऊस गाळप सुरू करण्याचा आदेश राज्य सरकारने देऊनही दिवाळी आल्याने प्रत्यक्षात गाळपास उशिरा सुरुवात झाली. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाचाही गाळप सुरु हाेण्यावर परीणाम झाला.

  राज्यात सध्या ८८ सहकारी व ९२ खासगी असे एकूण १८० साखर कारखाने ऊस गाळप करत आहेत. कोल्हापूर विभागात २१ सहकारी व ११ खासगी असे एकूण ३२ कारखाने तर पुणे विभागात १६ सहकारी व ११ खासगी असे २७ कारखाने ऊस गाळप करत आहेत. सोलापूरमध्ये सहकारी १५ व खासगी २९ असे ४४ कारखाने, नगर विभागात १४ सहकारी व १० खासगी असे २४, औरंगाबाद विभागामध्ये १३ सहकारी ९ खासगी असे ११, नांदेड विभागात ९ सहकारी व १९ खासगी असे २८ तर अमरावतीत दोन तर नागपुरात एक खासगी कारखाना गाळप हंगामात सहभागी झाला आहे.

  चालू हंगामात आतापर्यंत २०२.४४ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. या उसगाळपातून १६.३५ लाख टन साखर उत्पादित झाली आहे. सर्वाधिक साखर उत्पादन पुणे जिल्ह्यात ३.९ लाख टन तर सोलापूर विभागात ३.०४ लाख टन उत्पादन झाले आहे. कोल्हापूर विभागात ३.२, नगर विभागात २.२ लाख टन उत्पादन झाले आहे. यंदाच्या उसगाळप हंगामात पहिल्या सव्वा महिन्यात आतापर्यंत केवळ ८ टक्के साखर उतारा मिळाला आहे. गेल्या वर्षी हाच साखर उतारा ८.८७ टक्के इतका होता. राज्यात सर्वाधिक साखर उतारा कोल्हापूर विभागात ८.९५ टक्के मिळाला आहे. अमरावती विभागात केवळ दोन खासगी कारखाने सुरू असले तरी तेथे साखर उतारा ८.४९ टक्के आल्याचे साखर आयुक्तालयाकडून मिळालेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. पुणे विभागात ८.३३, सोलापूर विभागात ७.३९ नगर विभागात ७.९६, नांदेड विभागात ८.१२, तर औरंगाबाद विभागात सर्वात कमी ६.८३ टक्के साखर उतारा मिळाला आहे.

  पावसाने ओढ दिल्याने उताऱ्यावर परीणाम

  पावसाने ओढ दिल्याने ऊस वाढीवर परिणाम झाला आहे. त्यामुळेच साखर उतारा कमी मिळाल्याचे कारखानदारांचे म्हणणे आहे. याचा परिणाम लागवडीवर देखील झाला असून गाळप हंगाम यंदा आणखी दोन ते अडीच महिनेच सुरू राहील, अशी शक्यताही कारखानदार व्यक्त करत आहेत. गेल्या वर्षी याच काळात राज्यात १९२ साखर कारखाने सुरू होते. त्यातून २७८ लाख टन उसाचे गाळप होऊन २४ लाख टन साखर उत्पादित झाली होती.