
अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी खरेदीची लगबग सुरू झाली आहे. पण यंदा मूर्तीसह सजावट साहित्यांच्या वाढलेल्या किमतीमुळे महागाईच्या झळा गणेश भक्तांना सोसाव्या लागत आहेत. मूर्तीच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांची वाढ आहे.
पंढरपूर : अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी खरेदीची लगबग सुरू झाली आहे. पण यंदा मूर्तीसह सजावट साहित्यांच्या वाढलेल्या किमतीमुळे महागाईच्या झळा गणेश भक्तांना सोसाव्या लागत आहेत. मूर्तीच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांची वाढ आहे. प्रसादात प्रतिकिलो २० रुपयांसह सजावट साहित्यातही वाढ आहे. अडीच फुटांची मूर्तीची किंमत चार ते पाच हजारांपर्यंत गेली आहे. घरगुती गणेशमूर्ती यंदा तीनशे ते पाचशे रुपयांपर्यंत मिळत आहे.
कारागिरांची मजुरी वाढली
मूर्ती कारागिरांची मजुरी किमान सातशे रुपयांपर्यंत पोहोचली आहे. त्यात रंगाचे दर तीस टक्क्यांनी वाढले आहेत. गतवर्षी २० लिटर रंगाची बकेट चार हजारांपर्यंत होती. यंदा तीच बकेट सात हजार रुपयांपर्यंत गेली आहे. सोनेरी रंग पंधराशे ते अठराशे रुपये किलो होता, यावर्षी तोच रंग दोन हजार रुपये झाला आहे. गेल्या वर्षी मजुरी किमान पाचशे रुपये होती, ती आता सातशे रुपयांपर्यंत पोहोचली आहे. याचाच परिणाम मूर्तीच्या किमतीवर झाला आहे.
पूजा साहित्य दरात वाढ झाली आहे. मागील वर्षी चारशे रुपयांना विकला जाणारा पूजेच्या साहित्याचा बॉक्स सहाशे रुपयांना विक्री केला जात आहे. यंदा गणेश भक्तांना महागाईची चांगलीच झळ बसणार आहे. मूर्तीमध्ये मागणी वाढली असली तरी सातत्याने नव्याने ऑर्डर द्यावी लागते.
-सूरज कुंभार, मूर्ती विक्रेते.
पूजा साहित्य आणि प्रसाद है नाशवंत असल्याने खरेदी करताना मागणीचा विचार करावा लागतो. त्यामुळे किमतीमध्ये खूप चढ-उतार आहेत.
-योगेश आराध्य, पूजा साहित्य व प्रसाद विक्रेते