Pune International Marathon
Pune International Marathon

  पुणे : यंदाची पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा  रविवार दि ०३ डिसेंबर रोजी पहाटे ३. ३० वाजता सुरू होईल. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही त्याच मार्गावर ही स्पर्धा हाेणार आहे. पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथाॅन ट्रस्टचे विश्वस्त आणि स्पर्धेचे संयाेजक अॅड. अभय छाजेड, सुमंत वाईकर, राेहन माेरे यांनी पत्रकार परिषदेत स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले. तसेच नाव नाेंदणीस सुरुवात झाल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी माजी आमदार दीप्ती चवधरी या उपस्थित हाेत्या.

  नांदेड सिटीतील सर्कल येथे वळसा घालून परत

  सणस मैदान येथील हॉटेल विश्व चौकातून या ४२ किमी अंतराच्या  महिला–पुरुष पूर्ण मॅरेथॉनला ०३ डिसेंबर रोजी पहाटे ३. ३० वाजता फ्लॅग ऑफ करण्यात येईल. तसेच पहाटे ४. ० ० वा. महिला–पुरुष  हाल्फ मॅरेथॉन सुरु होईल. ही पूर्ण  मॅरेथॉन सणस मैदान हॉटेल विश्व चौक – सारसबाग – सेनापती बापट पुतळा- सिंहगड मार्ग- नांदेड सिटीतील सर्कल येथे वळसा घालून सणस मैदान येथे परत येईल.

  १२ हजारहून  अधिक स्पर्धक या स्पर्धेत  सहभागी

  पुन्हा त्याच मार्गाने दुसरी फेरी पूर्ण करून सणस मैदान येथे ४२. १९५ किमीचा टप्पा पार करेल. तसेच महिला – पुरुषांची हाल्फ मॅरेथॉन सणस मैदान – सारसबाग –सेनापती बापट पुतळा- सिंहगड मार्ग–नांदेड सिटी सर्कल येथे वळसा घालून त्याच मार्गाने सणस मैदान येथे २१ किमीचा टप्पा पार करेल. याशिवाय १० किमी , ५ किमी, व्हील चेअर, फॅमिली रनदेखील असणार आहेत. एकूण १२ हजारहून  अधिक स्पर्धक या स्पर्धेत  सहभागी होतील अशी अपेक्षा आहे.

  याच्या प्रवेशाची अंतिम तारीख २० नोवेंबर २०२३ असून  मॅरेथॉन भवन, मित्रमंडळ चौक ,पर्वती, पुणे -०९ येथे प्रत्यक्ष सकाळी १० ते सायंकाळी ६ . ०० या वेळेत अथवा www.marathonpune.com  येथे आॅनलाईन  प्रवेश  अर्ज भरता येऊ शकेल.  या स्पर्धेतील विजेत्यांना पुणे महानगर पालिकेतर्फे ३५ लाख रुपयांची बक्षिसे दिली जातील.