‘माझ्यावर कारवाई करणाऱ्यांनी स्वतःचे योगदान बघावे’; विशाल पाटील यांची टीका

सांगली लोकसभा मतदारसंघात (Sangli Lok Sabha) महविकास आघाडी विरोधात बंडखोरी केलेले काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील (Vishal Patil) यांच्यावर कारवाई करण्यासाठी शिवसेनेकडून दबाव वाढत चालला आहे.

    सांगली / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : सांगली लोकसभा मतदारसंघात (Sangli Lok Sabha) महविकास आघाडी विरोधात बंडखोरी केलेले काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील (Vishal Patil) यांच्यावर कारवाई करण्यासाठी शिवसेनेकडून दबाव वाढत चालला आहे. याबाबत विशाल पाटील यांनी माझ्या कुटुंबीयांपेक्षा जास्त योगदान काँग्रेस साठी असेल त्यानेच माझ्या निलंबनाच्या पत्रावर सही करावी, असे आव्हान काँग्रेस श्रेष्ठींना दिले आहे.

    गुरुवारी सांगलीत झालेल्या काँग्रेसच्या मेळाव्यात त्यांच्यावर कारवाई होते का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, महाविकास आघाडीविरोधात बंडखोरी करणारे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्यावरील कारवाईचा अहवाल कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून तयार केला आहे. तो दिल्लीला पाठविण्यात येईल. दिल्लीतील निर्णयाप्रमाणे कारवाई होईल, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

    दरम्यान, आज शिवसेनेकडून पुन्हा विशाल पाटील यांच्यावर कारवाई करण्यासाठी दबाव वाढला. याबाबत विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील विशाल पाटील यांचे वय कमी आहे, त्यांनी भविष्याचा विचार करून निर्णय घ्यावा, असा सल्ला दिला तर काँग्रेसकडून देखील विशाल पाटील यांनी महविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा. अन्यथा कारवाई करावी लागेल, असा इशारा दिला.

    त्यावर विशाल पाटील म्हणाले, “माझ्यावर कारवाई करताना, त्या पत्रावर सही करणाऱ्यांनी आपलं काँग्रेस करिता योगदान काय ?, हे पाहावं, ते आमच्या कुटुंबापेक्षा जास्त आहे का ? हे तपासावे, आणि त्यांनी कारवाई खुशाल करावी” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

    त्यामुळे आता अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे, मात्र तरी देखील ते कार्यकर्त्यांना आक्रमक “भूमिका घेऊ नका, आजही आपलं काँग्रेसवर प्रेम आहे.” असं सांगत असल्याचे सांगताना दिसत आहेत.