ट्रॅव्हल्समधून लाखोंची रोकड चोरणाऱ्यांना अटक; भुईंज पोलिसांची उत्तर प्रदेशात जाऊन कारवाई

बोपेगाव (तालुका वाई) गावाच्या हद्दीत खाजगी ट्रॅव्हल्समधून प्रवाशाची ९६ लाखाची रोकड चोरून नेणाऱ्या परप्रांतीय चोरट्यांना भुईंज पोलिसांनी उत्तर प्रदेश राज्यातून अटक केली आहे.

  सातारा : बोपेगाव (तालुका वाई) गावाच्या हद्दीत खाजगी ट्रॅव्हल्समधून प्रवाशाची ९६ लाखाची रोकड चोरून नेणाऱ्या परप्रांतीय चोरट्यांना भुईंज पोलिसांनी उत्तर प्रदेश राज्यातून अटक केली आहे. भुईंज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गरजे यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने ही धडक कारवाई केली.

  पोलिसांनी घटनास्थळावरून प्राप्त केलेले सीसीटीव्ही फुटेज व आरोपींच्या संदर्भात केलेले तांत्रिक विश्लेषण यावरुन पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

  हसन जुम्मन मोहम्मद (वय २२, रा. भवानी गड, महाराजगंज, जिल्हा रायबरेली, राज्य उत्तर प्रदेश) व इस्तियाग जान मोहम्मद (वय २१, रा. पदरिया महाराजगंज, रायबरेली, उत्तर प्रदेश) अशी संबंधित आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून ८३ लाख रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे.

  बोपेगाव तालुका वाई गावाच्या हद्दीत हॉटेल कोहिनूर येथे खाजगी ट्रॅव्हल्स जेवणासाठी थांबवली असता फिर्यादीच्या सीटवरील बॅगेतून या दोघांनी ९६ लाखाची रोकड लांबवली होती. भुईंज पोलीस ठाण्यामध्ये याबाबतची फिर्याद दाखल करण्यात आली होती. भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गरजे यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने तपासाच्या दृष्टीने लक्ष केंद्रित केले घटनास्थळावरून मिळालेली सीसीटीव्ही फुटेज यावरून दोन इसमांच्या हालचाली संशयास्पद आढळून आल्या.

  दरम्यान त्यामधील एका संशयित आरोपीने नवी दिल्ली व उत्तरप्रदेश येथे चोरी केल्याची माहिती समोर आली. भुईंज पोलिसांनी तात्काळ उत्तर प्रदेश येथे जाऊन दिल्लीपासून सहाशे किलोमीटर अंतर पाठलाग करून भवानीगड येथे एका आरोपीला अटक केली व दुसऱ्या आरोपीला रायबरेली येथून ताब्यात घेण्यात आले. संबंधितांकडून ८३ लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ट्रॅव्हल्सच्या क्लीनरचा सध्या शोध सुरू आहे.

  संशयिताकडून १ कोटी १५ लाख ३ हजार ५२१ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक विशाल भंडारी, पोलीस उपनिरीक्षक वैभव टकले, नितीन जाधव, सोमनाथ बल्लाळ, रविराज वर्णेकर, सागर मोहिते, किरण निंबाळकर, राजेश कांबळे, अजय जाधव यांनी भाग घेतला.