कुटूंबाला जगू न देण्याची धमकी दिली अन्…; कुख्यात गुन्हेगारांचा सहकारनगरमध्ये तुफान राडा

पुणे शहरात वाहन तोडफोड आणि दहशत माजवण्याच्या घटना सुरूच असून, सहकारनगर भागात दोन कुख्यात गुन्हेगारांनी दहशत माजवत तुफान राडा घातला. एका तरुणावर कोयत्याने वार करून कुटूंबालाच जगू न देण्याची धमकी देखील दिली आहे. पोलिसांनी तिघांना पकडले आहे.

    पुणे : पुणे शहरात वाहन तोडफोड आणि दहशत माजवण्याच्या घटना सुरूच असून, सहकारनगर भागात दोन कुख्यात गुन्हेगारांनी दहशत माजवत तुफान राडा घातला. एका तरुणावर कोयत्याने वार करून कुटूंबालाच जगू न देण्याची धमकी देखील दिली आहे. पोलिसांनी तिघांना पकडले आहे.
    राजू संजय लोंडे उर्फ डड्या (वय २६), राज रवि वाघमारे उर्फ हीरव्या (वय १८) व सूशिल गोरे (वय १८) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये गुनाजी आण्णा वाघमारे (वय ४३) हे गंभीर जखमी झाले आहेत.
    राजू व राज हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांची या भागात दहशत आहे. राजू लोंडे याच्यावर १३ गुन्हे दाखल आहेत. तर, राज वाघमारे याच्यावर ५ गुन्हे दाखल आहेत. तक्रारदार हे तळजाई वसाहत येथे राहण्यास आहेत. दरम्यान, मंगळवारी रात्री दोन कुख्यात गुनहेगारांसह तिघेजण त्यांच्या घरात घुसले. त्यांनी तक्रारदार व त्यांच्या कुटूंबियांना शिवीगाळ केली.
    तसेच, त्यांच्यावर कोयत्याने वार करून त्यांना जखमी केले. त्यानंतर परिसरात कोयते हवेत दाखवत दहशत माजवली. त्यामुळे नागिरकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. इतकेच नव्हे तर या आरोपींनी पोलिसांत तक्रार केल्यास कुटूंबाला जगू न देण्याची धमकी देखील दिली आहे. दरम्यान पोलिसांनी या तिघांना अटक केली असून, पुढील तपास सहकारनगर पोलीस करत आहेत.