
मुखई (ता. शिरुर) येथील धुमाळ वस्ती येथे सहा दरोडेखोरांच्या टोळक्याने एका बंगल्यावर दरोडा टाकत महिलेला धाक दाखवत रोख रक्कम व सोन्याचे दागिने, असा तब्बल ३ लाख ८० हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिक्रापूर : मुखई (ता. शिरुर) येथील धुमाळ वस्ती येथे सहा दरोडेखोरांच्या टोळक्याने एका बंगल्यावर दरोडा टाकत महिलेला धाक दाखवत रोख रक्कम व सोन्याचे दागिने, असा तब्बल ३ लाख ८० हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत सीमा विलास येळवंडे (वय ३५, रा. धुमाळ मळा, मुखई, ता. शिरुर) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात सहा युवकांवर गुन्हे दाखल केले. मुखई येथील धुमाळ वस्ती येथे सिमा येळवंडे यांच्या बंगल्याची पूजा १९ डिसेंबर रोजी झाली. त्यानंतर गुरुवारी पहाटेच्या सुमारास सीमा यांचे पती शेतातील कामांसाठी मजूर आणण्यासाठी गेले असता सिमा यांनी बंगल्याचा दरवाजा बंद केला. काही वेळात अचानक सर्व लाईट बंद होत दरवाजाचा टकटक आवाज आल्याने सीमा यांनी ‘कोण आहे’, असे विचारले.
मात्र, काहीही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी घाबरून पतीला फोन करत घडलेला प्रकार सांगितला. काही वेळात दरवाजाची कडी तोडून चार युवक घरात शिरले. त्यांनी सीमा यांना गजाचा धाक दाखवून कोपऱ्यात बसवून ‘पैसा अडका कोठे आहे’, असे म्हणत कपाटाचा दरवाजा तोडून कपाटातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त टाकून रोख दोन लाख रुपये आणि काही सोन्याचे दागिने काढून घेतले.
फिर्यादींसह पतीकडून दरोडेखोरांचा पाठलाग
दरम्यान, ‘अजून पैसे कोठे आहेत, दे नाहीतर मारुन टाकीन’, अशी धमकी देत सीमा यांच्या गळ्यातील मंगळसूत्र व कानातील झुमके काढून घेतले. तर बाहेर उभ्या असलेल्या दोघांनी ‘गाडी येत आहे, बाहेर या’, असा आवाज दिल्याने घरातील चौघे सीमा यांचा मोबाईल फरशीवर फोडून बाहेर पळाले. सीमा सुद्धा त्यांच्या मागे पळाल्या. त्याचवेळी त्यांचे पती तीन मजुरांसह घरासमोर आले. त्यांनी सहा दरोडेखोरांचा काही अंतर पाठलाग केला. मात्र, दरोडेखोर सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ३ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज घेऊन पळून जाण्यात यशस्वी ठरले.
पोलीस पथकाकडून घटनास्थळी पाहणी
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे, पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे, पोलीस हवालदार श्रीमंत होनमाने, गणेश सुतार, विशाल देशमुख यांसह आदींनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव स्वामी व पोलीस नाईक प्रताप कांबळे हे करत आहे.
बंगल्याच्या पूजेनंतर दोनच दिवसात दरोडा
सीमा येळवंडे यांच्या बंगल्याची १९ डिसेंबर रोजी पूजा झाली होती. तसेच त्यांनी शेतमालाचे ८० हजार रुपये २० डिसेंबर रोजी घरात आणून ठेवले होते. त्यानंतर लगेचच दरोड्याचा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली असून नागरिक व ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.