मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा फोन; ‘समा, आसिफ मुंबईत करणार घातपात’, सुरक्षा यंत्रणा ‘अलर्ट’वर…

पोलिसांना फोनवरून धमकी देण्याचे सत्र सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत मोठा घातपात करण्याची धमकी देण्यात आली होती. ही घटना ताजी असताना दक्षिण मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला पुन्हा मुंबईत घातपात करण्यात येणार असल्याचा धमकीवजा फोन आला.

    मुंबई : पोलिसांना फोनवरून धमकी देण्याचे सत्र सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत मोठा घातपात करण्याची धमकी (Threatening Call) देण्यात आली होती. ही घटना ताजी असताना दक्षिण मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला पुन्हा मुंबईत घातपात करण्यात येणार असल्याचा धमकीवजा फोन आला. यावेळी धमकी देणाऱ्याने नावे घेतली असून, गुजरातची समा आणि काश्मीरचा आसिफ हा मुंबईत घातपात करणार असल्याचे फोन करणाऱ्याने सांगितले.

    मुंबईवर 26/11 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला 15 वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर हा धमकीचा फोन आल्याने यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. पोलिस फोन घेणाऱ्या महिला अधिकाऱ्याने अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. एटीएसच्या अधिकाऱ्यांना ओळखत असल्याचे शोएब नावाच्या कॉलरने म्हटले आहे.

    घातपात घडवणारे समा आणि आसिफचे हे एकमेकांच्या संपर्कात असून, त्याचे फोन नंबरदेखील पोलिसांना देण्यात आल्याचे म्हटले आहे. मुंबई पोलिसांनी सध्या सर्व यंत्रणांना अलर्ट केले असून, तपास सुरू करण्यात आला आहे.