बेकायदेशीर शस्त्रे बाळगल्याप्रकरणी तिघांना अटक, मल्हारपेठ पोलिसांची कारवाई; शस्त्र साठ्यासह चारचाकी गाडी जप्त

नाडे- नवारस्ता (ता. पाटण) गावाच्या हद्दीत कराड- चिपळूण मार्गावरील पांढरवाडी येथे दहशत माजविण्याच्या उद्देशाने बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी तीन जणांना मल्हारपेठ पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केले.

    कराड : नाडे- नवारस्ता (ता. पाटण) गावाच्या हद्दीत कराड- चिपळूण मार्गावरील पांढरवाडी येथे दहशत माजविण्याच्या उद्देशाने बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी तीन जणांना मल्हारपेठ पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केले. या कारवाईत त्यांच्याकडून शस्त्र साठ्यासह चार लाख रुपयांची मारुती सुझुकी कारही जप्त करण्यात आली आहे.

    स्वप्निल तानाजी हिप्परकर (वय २०) रा. कर्नाळा रोड (रामनगर) सांगली, सुरज भगवान कोळी (वय २६) रा. निकम गल्ली, सातवे, ता. पन्हाळा, किशोर महादेव नाईक (वय २२) रा. गल्ली नंबर १ उमाजीनगर, दानोळी, ता. शिरोळ अशी याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.

    मंगळवारी (दि. २९) मल्हारपेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर यांना सूत्रांकडून पांढरवाडी (नाडे) गावच्या हद्दीत कराड-चिपळूण रस्त्याच्या बाजूला कोहिनूर मोटर गॅरेजसमोर एक पांढऱ्या रंगाची कार (एमएच १० सीए ९३५९) उभी असून, त्यामध्ये कोणीतरी संशयित इसम आहेत, अशी माहिती मिळाली. याप्रकरणी संशयित स्वप्निल हिप्परकर, सुरज कोळी व किशोर नाईक यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांच्याकडे स्टीलची मूठ असलेली तलवार, लाकडी मूठ असलेला पारशी सुरा, नेपाळी कुकरी व मारुती सुझुकी कंपनीची सियाज कार मिळून आली. याप्रकरणी मल्हारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार संदीप घोरपडे यांनी खबर दिली. त्यानुसार घातक शस्त्रे जवळ बाळगल्याप्रकरणी भारतीय शास्त्र अधिनीयम व शस्त्रबंदी आदेश कायद्यानुसार मल्हारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस हवालदार पृथ्वीराज पाटील तपास करत आहेत.

    दहशत माजविण्याचा इरादा

    मल्हारपेठ पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत कारमध्ये बोलत बसलेल्या तीन अनोळखी इसमांकडे विचारपूस केली. यावेळी पळण्याच्या तयारीत असताना त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता, त्यामध्ये धारदार शस्त्रे मिळून आली. दहशत माजविण्याच्या इराद्याने त्यांनी ही शस्त्रे गाडीत ठेवली होती.