सराईताचा खून बहिणीची छेड काढल्यावरून झाल्याचे उघड ; लष्कर परिसरातील हत्येप्रकरणी तिघांना अटक

अरबाज याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना शनिवारी पहाटे ताबूत स्ट्रीट परिसरात घडली होती. अरबाज हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, चोरी, मारहाण, विनयभंग असे २५ गुन्हे समर्थ आणि खडक पोलिसांत दाखल होते.

    पुणे : लष्कर परिसरात झालेल्या सराईताच्या खुनाचा उलगडा झाला असून, बहिणीची छेड काढल्याने त्याचा खून केला असल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली आहे.फैजान रफिक शेख (वय २६, रा. चुडामण तालीमजवळ, भवानी पेठ), गुफरान मुज्जफर मोमीन (वय २१, रा. याकुबनगर चौक, भवानी पेठ) आणि जगदीश शंकर दोडमणी (वय २२, रा. भवानी पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अरबाज ऊर्फ बबन इकबाल शेख (वय ३५, रा. भवानी पेठ) असे खून झालेल्या गुंडाचे नाव आहे.

    अरबाज याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना शनिवारी पहाटे ताबूत स्ट्रीट परिसरात घडली होती. अरबाज हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, चोरी, मारहाण, विनयभंग असे २५ गुन्हे समर्थ आणि खडक पोलिसांत दाखल होते. तो खाद्यपदार्थ विक्रेत्यांना धमकावून त्यांच्याकडून पैसे घेत होता. त्याच्यावर एमपीडीएनुसार कारवाई केली होती. वर्षभरासाठी त्याला कारागृहात ठेवण्यात आले होते. तो नुकताच कारागृहातून बाहेर आला होता. त्याच्या वर्तणुकीत सुधारणा झाली नव्हती. त्याने पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केली. त्याने एका तरुणीची छेड काढली होती. या गुन्ह्यात तो फरार होता.

    तीक्ष्ण शस्त्राने वार

    छेडछाडीमुळेच अरबाजचा खून करण्याचा कट आरोपींनी रचला. शनिवारी मध्यरात्री त्याला ताबूत स्ट्रीट भागात आरोपींनी बोलवले आणि तीक्ष्ण शस्त्राने वार केले होते. खुनानंतर आरोपी पसार झाले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने आरोपींचा शोध घेत त्यांना पकडले. चौकशीत बहिणीची छेड काढल्याने खून केल्याची कबुली आरोपींनी दिली.