सुलेमानी खडा विक्रीच्या नावाखाली पुणेकरास पाच लाखांस गंडविले, तिघांना अटक

या दोघा तोतया पोलिसांसह जफारभाई यांनी आढाळगे यांच्या हातातील पाच लाखांची रोकड असलेली पिशवी हिसकावून घेऊन त्यांना पळ काढला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर आढाळगे यांनी पोलिसांत धाव घेतली. दरम्यान, पोलिासांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली आणि अवघ्या दोन तासांत संबंधित टोळीला सोलापुरातून अटक केली.

    सोलापूर : दुर्मीळ आणि लाभदायक मानल्या जाणाऱ्या सुलेमानी खडा विकण्याच्या नावावर पाच लाखांची फसवणूक करणाऱ्या टोळीला सोलापुरात पोलिसांनी अवघ्या दोन तासांत जेरबंद केले. या टोळीकडून लुटलेली पाच लाखांची रक्कमही हस्तगत करण्यात आली आहे.  सिराज मोहम्मद हाशम शेख, इम्रान इलाहीखान पठाण आणि सलमान जैनोद्दीन नदाफ अशी या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, सोलापुरात एक व्यक्ती सुलेमानी खड्याची विक्री करतो. सुलेमानी खडा दुर्मीळ असून तो अतिशय लाभदायक मानला जातो. हा खडा वापरल्यास कोणत्याही प्रकारचे संकट येत नाही. आयुष्यात भभराटच होते, अशी माहिती  पुण्याचे सूर्यकांत आढाळगे यांना एका मित्राकडून समजली. सुलेमानी खड्याची किंमत पाच लाख रूपये असून हा खडा विकत घेण्यापूर्वी संबंधित विक्रेत्याला समक्ष भेटून व्यवहाराची खात्री देण्यासाठी ठरलेली पाच लाखांची रक्कम प्रत्यक्ष दाखवावी लागते, अशीही माहिती आढाळगे यांना सांगण्यात आले. त्यानुसार त्यांना सुलेमानी खडा विकत घेण्याचा मोह झाला. सुलेमानी खडा खरेदीसाठी केरळ आणि कोल्हापूरहूनही काही लोक येणार आहेत, असे आढाळगे यांना सांगितले गेले.

    दरम्यान, सुलेमानी खडा खरेदी विक्रीसाठी व्यवहार करण्यासाठी सोलापुरात हॉटेल लोटसमध्ये एकत्र येण्याचे ठरले. आढाळगे यांनी या व्यवहारासाठी हॉटेलमध्ये स्वतः खोली घेतली. ठरल्याप्रमाणे जफरभाई नावाची व्यक्ती आणि इतर चारजण हॉटेलमध्ये खोलीत होते. सुलेमानी खडा खरेदीसाठी आणलेली पाच लाखांची रक्कम आढाळगे यांनी दाखवून जफरभाई यास खात्री पटवून दिली. परंतु त्याचवेळी त्यांच्या खोलीत दोघेजण आले आणि आम्ही गुन्हे शाखेचे पोलीस असल्याचे सांगत सर्वांना धमकावले. आढाळगे यांनाही शिवीगाळ आणि धक्काबुक्की करून त्यांना खोलीतून बाहेर पडण्यास मज्जाव केला. नंतर त्या दोघा तोतया पोलिसांसह जफारभाई यांनी आढाळगे यांच्या हातातील पाच लाखांची रोकड असलेली पिशवी हिसकावून घेऊन त्यांना पळ काढला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर आढाळगे यांनी पोलिसांत धाव घेतली. दरम्यान, पोलिासांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली आणि अवघ्या दोन तासांत संबंधित टोळीला सोलापुरातून अटक केली.