सराईत गुन्हेगाराकडून घरफोडीचे तीन गुन्हे उघड, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; सुमारे ११ लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत

स्थानिक गुन्हे शाखेने एका सराईत गुन्हेगाराला जेरबंद करून त्याच्याकडून तीन घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात यश मिळवले आहे. तसेच त्याच्याकडून सुमारे ११ लाख रुपये किंमतीचे २० तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

सातारा : स्थानिक गुन्हे शाखेने एका सराईत गुन्हेगाराला जेरबंद करून त्याच्याकडून तीन घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात यश मिळवले आहे. तसेच त्याच्याकडून सुमारे ११ लाख रुपये किंमतीचे २० तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ८ मार्च रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, सराईत गुन्हेगार शशिकांत उर्फ बिल्डर अनंत माने (रा. मोरया हाउसिंग सोसायटी, वेताळ नगर, चिंचवड, पुणे) याने सातारा शहरातील समर्थ नगर येथे घरफोडी केली आहे. माहिती मिळाल्याप्रमाणे देवकर यांनी पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे व त्यांच्या पथकास संबंधितास ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या.

या कारवाईत पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार, रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, पोलिस अंमलदार तानाजी माने, सुधीर बनकर, आतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, मंगेश महाडिक, मुनीर मुल्ला, अमोल माने, अजित करणे, स्वप्निल माने, प्रवीण कांबळे, स्वप्निल दौंड, शिवाजी भिसे, केतन शिंदे, प्रवीण पवार, मोहसीन मोमीन, गणेश कचरे, अजय जाधव, अमित झेंडे यांनी सहभाग घेतला.

दोन गुन्ह्यांची कबुली

तपास पथकाने संशयितांच्या ठिकाणाबाबत गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाद्वारे माहिती घेऊन त्यास ताब्यात घेत त्याला अटक केली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने आणखी दोन गुन्ह्यांची कबुली दिली. त्याच्याकडून तीनही घरफोडीच्या गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मुद्देमाला पैकी ८ लाख २८ हजार पाचशे रुपये किमतीचे सोन्याचे दागिने (चालू बाजारभावाप्रमाणे अकरा लाख) हस्तगत करण्यात आले आहेत.