nagpur accident

चमेली गावातून शिवा गावाकडे दुचाकीने जात असताना नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावर चकडोह गावाजवळ आज सकाळी मागून येणाऱ्या एका ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली.

    नागपूर: एका खासगी कंपनीत मुलाखतीसाठी जाणाऱ्या दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने नागपुरात (Nagpur News) तिघांचा मृत्यू झाला आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात (nagpur Accident) झाल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात रोशन सहारे हा युवक गंभीर जखमी झाला. रोशनला रुग्णालयात नेण्यात आलं मात्र उपचारापूर्वीच त्याचाही मृत्यू झाला.

    मिळालेल्या माहितीनुसार, सुषमा वाघाडे, प्रतीक्षा वाघाडे आणि रोशन साहारे हे तिघंजण एका खासगी कंपनीत मुलाखातीसाठी जात होते. चमेली गावातून शिवा गावाकडे दुचाकीने जात असताना नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावर (Nagpur Amravati National Higway) चकडोह गावाजवळ आज सकाळी मागून येणाऱ्या एका ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. सुषमा वाघाडे आणि प्रतीक्षा वाघाडे या दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर रोशन सहारे याला उपचारासाठी नागपुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचार करण्याआधीच त्याचाही मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच कोंढाळी पोलीसांनी घटनास्थळी पोहोचले. मृतदेहांचा पंचनामा करण्यात आला.

    चकडोह फाट्यावर झालेल्या या अपघातात ठार झालेल्या सुषमा, प्रतीक्षा आणि रोशन हे तिघेही कोंढाळीपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या चमेली गावचे रहिवासी होते. दरम्यान, या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याने चमेली गावावर शोककळा पसरली आहे.

    दरम्यान, अपघाताच्या गंभीर घटना घडल्यानंतर सर्वत्र रस्ते नियमावलीबद्दल चर्चा केली जात आहे. मात्र, तरीही अशा घटनांची वारंवार पुनरावृत्ती होत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे असे अपघात टाळण्यासाठी वेग-मर्यादा, गतिरोधक, घाट प्रारंभ मार्गावरील सावधानतेच्या सूचनांवर लक्ष देण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.