मांडूळ साप विक्री करणारे तिघे जेरबंद; एक सापही घेण्यात आला ताब्यात; वन विभागाची कारवाई

अवैधरित्या मांडूळ प्रजातीचा साप बाळगणारे व विक्री करणाऱ्या तिघांना वन विभागाच्या पथकाने शनिवारी सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मांडूळ प्रजातीचा साप एक नग ताब्यात घेण्यात आला असून, त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    अमरावती : अवैधरित्या मांडूळ प्रजातीचा साप बाळगणारे व विक्री करणाऱ्या तिघांना वन विभागाच्या पथकाने शनिवारी सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मांडूळ प्रजातीचा साप एक नग ताब्यात घेण्यात आला असून, त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    शहरानजीक असलेल्या MIDC परिसरात (जुना बायपास रोड) अंबिका मार्बलजवळ शनिवारी (दि.18) प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे, बनावट ग्राहक बनून, अमरावतीचे विभागीय वनाधिकारी (दक्षता) किरण पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी (फिरते पथक) अमरावती प्रशांत भुजाडे, वनपाल पी.व्ही. निर्मळ, वन्यजीव अपराध नियंत्रण कक्षाचे वनरक्षक अनंत नायसे, स्वप्निल राऊत तसेच वनरक्षक हेमंत पांगरे, वनरक्षक दिनेश धारपवार, वनरक्षक, पी.आर. वानखडे, वनरक्षक, आर.ए. जुनघरे, वाहन चालक सी.बी. मानकर व इतर वनकर्मचाऱ्यांच्या मदतीने यशस्वी सापळा रचण्यात आला.

    यामध्ये संशयित इसम अंकूश रमेश पवार, (23 वर्षे) मंगल मधूकर बेले, (32 वर्षे) आणि प्रवीण हनुमंत लडके, (33 वर्षे) यांच्याकडून मांडूळ प्रजातीचा साप 1 नग ताब्यात घेण्यात आला आहे. सदर इसमांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून, सदर प्रकरणी गुन्हा क्रमांक 00552/13799, दाखल करण्यात आला आहे. सदर संशयित इसमाकडून मांडूळ प्रजातीचे व इतर वन्यप्राणी जिवंत स्वरुपात मिळण्याची शक्यता आहे.

    इसम हे सराईत गुन्हेगार असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. त्या अनुषंगाने प्रकरणामध्ये सखोल तपास करण्यात येत आहे. सदर कारवाई यशस्वीरित्या पार पाडण्यात यादव तरटे पाटील, माजी सदस्य राज्य वन्यजीव मंडळ व वन्यप्रेमी, संजोग खोट्टे, नवनीत तराळे, अमित ओगले व वन्यजीव प्रेमी यांचे मोलाचे योगदान प्राप्त झाले. प्रकरणाचा पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) वडाळी कार्यालयामार्फत करण्यात येत आहे.