पुणे-बंगळुरू महामार्गावर झालेल्या अपघातात जयसिंगपूरचे एकाच कुटुंबातील तिघे जागीच ठार; इतर गंभीर

  सातारा : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात जयसिंगपूर येथील एकाच कुंटुबातील तिघे ठार झाल्याची घटना घडली. अपघाताच्या घटनेनंतर जयसिंगपूर येथील निवासस्थानी नातेवाईक व मित्र परीवाराने मोठी गर्दी केली होती. या घटनेमुळे जयसिंगपूर परीसरात शोककळा पसरली आहे.
  एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
  या अपघातात शशिकांत यदुनाथ सवाखंडे (वय ६५), मुलगा निखिल शशिकांत सवाखंडे (वय ३०), सून प्रियांका निखिल सवाखंडे (वय २८) हे जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी सकाळी सुमारास घडली. तर मुलगी डॉ. श्वेता शशिकांत सवाखंडे (वय ३२), भावजय कमल दिलीप सवाखंडे (वय ६०) सर्व रा. महालक्ष्मी मंदिरसमोर शाहूनगर जयसिंगपूर जि. कोल्हापूर हे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
  ठाणे येथून परतताना साताराजवळ झाला अपघात
  याबाबत अधिक महिती अशी, निखिल सवाखंडे यांच्या मामाचे ठाणे येथे निधन झाल्यामुळे जयसिंगपूर येथून २३ ऑगस्ट रोजी जयसिंगपूर येथील सवाखंडे कुटुंबीय ठाणे येथे कार्यासाठी गेले होते. ठाणे येथे रक्षाविसर्जन व विधीकार्य आटोपून शुक्रवारी रात्री एकच्या सुमारास तवेरा चारचाकी वाहनातून ते जयसिंगपूरकडे परत येण्यासाठी निघाले होते.
  टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले
  या वाहनात शशिकांत सवाखंडे, निखिल सवाखंडे, प्रियांका सवाखंडे, डॉ. श्वेता सवाखंडे, कलम सवाखंडे, संगिता सवाखंडे व सुमेध सवाखंडे चालक असेे ७ जण होते. सकाळी सातच्या सुमारास सातारा येथील बॉम्बे हॉटेलजवळ आल्यानंतर अचानक तवेरा गाडीचे टायर फुटले. त्यामुळे चालकांचे नियंत्रण सुटल्याने समोर आलेल्या टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक बसली. या अपघातात तिघे ठार झाले.
  नातेवाईकांचा आक्रोश
  अपघाताची घटना समजल्यानंतर जयसिंगपूर येथील नातेवाईकांना मोठा धक्क बसला. त्यानंतर नातेवाईक व मित्र परिवार साताराकडे रवाना झाले. तर दिवसभर अनेक नातेवाईक जयसिंगपूर येथे दाखल झाले होते. तर एकाच कुटुबांतील तिघांचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी आक्रोशाने हबंरडा फोडला. रात्री उशिरा मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.