पुण्यातील तीन पोलिस कर्मचारी तडकाफडकी निलंबीत; ‘हे’ आहे कारण

पुणे शहर पोलीस दलातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळून गेल्याप्रकरणात हे निलंबन करण्यात आले आहे.

    पुणे : पुणे शहर पोलीस दलातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळून गेल्याप्रकरणात हे निलंबन करण्यात आले आहे. येरवडा कारागृहातून तीन आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना पुन्हा येरवडा कारागृहात ठेवण्यासाठी पोलीस कर्मचारी त्यांना घेऊन जाते होते. परंतु, परस्पर त्यांनी आरोपीला खासगी रिक्षाने घेऊन निघाले असता तो आरोपी रिक्षातून पळाला.

    पोलीस हवालदार मुरलीधर महादु कोकणे, पोलीस नाईक निलेश विनायक गुरव आणि राजूदास रामजी चव्हाण अशी निलंबीत करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी हा आदेश दिला आहे.

    पोलीस मुरलीधर, निलेश व राजूदास हे कोर्ट कंपनीत कर्तव्यास आहेत. त्यांची नेमणूक पोलीस मुख्यालयात आहे. येरवडा कारागृहातून आरोपींना घेऊन त्यांना सत्र न्यायालयात खटल्याच्या सुनावणीला हजर करण्यास आले होते. न्यायालयातील कामकाज संपल्यावर त्यांना पुन्हा येरवडा कारागृहात आरोपींना जमा करण्यासाठी कर्तव्यावर तिघांची २ ऑगस्ट रोजी नेमणूक करण्यात आली होती. त्याप्रमाणे त्यांनी आरोपींना न्यायालयात हजर केले. त्यातील एक आरोपी राजेश रावसाहेब कांबळे याला पुढील तारीख देण्यात आली. इतर आरोपींच्या खटल्याचे काम सुरु होते. त्यावेळी राजूदास चव्हाण यांनी राजेश कांबळे याला खासगी रिक्षाने घेऊन जाऊन येरवडा कारागृहात जमा करतो, असे सांगितले. त्याला इतर दोघांनी होकार दिला.

    त्याप्रमाणे चव्हाण कांबळे याला रिक्षाने घेऊन निघाले. परंतु, कांबळेने तहान लागल्याचे सांगितल्याने वाटेत रिक्षा थांबविली. ते पाणी आणण्यास गेले असता कांबळे रिक्षातून उतरला आणि साथीदाराच्या दुचाकीवर बसून पळून गेला. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पळून गेल्याने तिघा पोलीस कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे.