मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावर तीन गाड्या एकमेकांना धडकल्या, तीन जणांचा जागीच मृत्यू

मृत आणि जखमी व्यक्तींच्या नातेवाईकांशी संपर्क झाल्याची माहिती पोलीस यंत्रणेने दिली आहे.

  खोपोली : मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गावर आज पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास तीन गाड्यांचा एकमेकांवर आदळून मोठा अपघात झाला आहे. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहेत तर अन्य जखमींना उपचारासाठी वेगवेगळ्या ठिकाणी हलविण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे. मुंबई पुणे लेनवर ३८.२०० किलो मीटर मुंबई जाणाऱ्या मार्गिकेवर सकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात पाईप घेऊन जाणाऱ्या ट्रक आणि कोंबडी वाहून येणारा टेम्पो आणि एक ओमनी अशा तीन गाड्या एकमेकांना धडकल्या. या तीन गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या एकूण प्रवाश्यांपैकी अकरा लोकांना या अपघाताचा फटका बसला आहे. यात तीन लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून यात एका महिलेचा समावेश आहे, अन्य चार लोक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना अधिक उपचारासाठी खोपोली तसेच एमजीएम रुग्णालय पनवेल येथे हलविण्यात आले आहे. मृत आणि जखमी व्यक्तींच्या नातेवाईकांशी संपर्क झाल्याची माहिती पोलीस यंत्रणेने दिली आहे.

  अपघात घडल्याचे समजताच या ठिकाणी आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, महामार्ग वाहतूक पोलीस, खोपोली पोलीस, डेटा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल त्याचप्रमाणे अपघात ग्रस्त सामाजिक संस्थेचे सदस्य या सर्वांनी मदत करून बाधित झालेली ट्राफिक पूर्ववत करण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नामुळे काही काळ बाधित झालेली ट्राफिक आता सुरळीत झाली असून अपघातात बाधित झालेल्या गाड्या बाजूला काढण्यात या सर्व यंत्रणांना यश आले आहे.

  अपघाताचे सविस्तर विश्लेषण

  दि.१० में २०२४ रोजी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील किलोमीटर ३८.२०० दरम्यान मुंबई लेनवर भीषण अपघात घडला. ट्रक क्र.के-५६/३२७७ वरील चालक बालाजी वडर वय २६ याच्या ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने त्याचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. त्यांनी पुढे चालणाऱ्या (कोंबडी वाहून नेणाऱ्या) टेम्पो क्रमांक एम.एच.-०३/सी.पी./२४२८ आणि ओमनी क्र.एम.एच.११/वाया./७८३२ या वाहनांना ट्रकची जोरात धडक बसली. या अपघातात ओमनी कारमधील चालकासह ५ व्यक्ती पैकी २ जणांचा मृत्यू झाला असून, त्यात १ महिला, १ पुरूष यांचा समावेश आहे, २ जण गंभीर जखमी तर चालक किरकोळ जखमी झाला आहे.

  कोंबड्या वाहून नेणाऱ्या टेम्पो मधील चालकासह ४ जणांपैकी २ गंभीर तर २ जण किरकोळ जखमी आहेत. ट्रकमधील चालकासह ३ इसमांपैकी १ मयत आणि २ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी एमजीएम हॉस्पिटल पनवेल आणि खोपोली नगरपालिका रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे. तीन मयत इसमांचे प्रेतं पुढील कार्यवाहीसाठी खोपोली नगरपालिका रुग्णालयात नेण्यात आली आहेत. अपघात ठिकाणी मदतीसाठी आयआरबीकडील देवदूत टिम, आयआरबी पेट्रोलींग टिम, मृत्युंजय दूत, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, लोकमान्य हॉस्पिटल ॲम्बुलन्स सेवा, महाराष्ट्र शासनाची १०८ ॲम्बुलन्स सेवा यांनी मदतकार्य केले.

  महामार्ग वाहतूक पोलीस – बोरघाटचे अधिकारी आणि कर्मचारी, खोपोली पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. अपघात झाल्यानंतर काही वेळासाठी वाहतूक बाधित झाली होती मात्र तात्काळ मदतकार्य पूर्ण करून वाहतूक खुली करण्यात आली आहे.