Three years rigorous imprisonment in molestation case, verdict of Additional Special District Judge

पीडिता पाणी भरण्याकरीता गेली असता आरोपी हा तेथे आला व त्याने पीडितेचा हात पकडला. त्यामुळे पीडिता ही घाबरली व तिने झटका देवून तिचा हात सोडविला व घरात धावत गेली. आरोपी हा पीडितेच्या मागे येऊन त्याने पीडितेचा विनयभंग केला. पीडितेने जोरात आरडाओरड केल्याने आरोपी हा तेथून पळून गेला.

    वर्धा : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणा-या आरोपीला तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. हा निकाल वर्धा येथील  अतिरिक्त विशेष जिल्हा न्यायाधीश-१ व्ही. टी. सूर्यवंशी यांनी दिला. आरोपी अजय दिपक बावणे ( रा. सोनोरा ढोक, ता. देवळी, जि. वर्धा ) यास कलम ७ व ८ बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार आरोपीला ३ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व २ हजार रुपये दंड न भरल्यास २ महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.

    घटनेची थोडक्यात हकीकत अशी की, पीडिता ही दिवाळीच्या सणाकरीता तिच्या मोठ्या बहिणीच्या घरी सोनोरा ढोक येथे गेली होती. १३ नोव्हेंबर २०१६ रोजी पीडिताचे बहीण, भाऊजी व त्यांची दोन्ही मुले शेतात गेली होती. पीडिता ही दुपारी २.३० वाजतांना ग्रा.पं. च्या नळावर पाणी भरण्याकरीता गेली असता आरोपी हा तेथे आला व त्याने पीडिताचा हात पकडला. त्यामुळे पीडिता ही घाबरली व तिने झटका देवून तिचा हात सोडविला व घरात धावत गेली. आरोपी हा पीडिताच्या मागे घरात येऊन त्याने पीडिताचा विनयभंग केला. पीडिताने जोरात आरडाओरड केल्याने आरोपी हा तेथून पळून गेला.

    त्यानंतर पीडितेची बहीण व भाऊजी शेतातून परत आल्यावर पीडितेने त्यांना घडलेली सर्व घटना सांगितली. त्यानंतर सदर घटनेचा तोंडी रिपोर्ट पीडितेने तिच्या बहिण व भाऊजी सोबत येऊन दिला. सदर प्रकरणाचा तपास पुलगावचे सहा पोलीस निरीक्षक सपना निरंजने गांव यांनी केला. तपासादरम्यान सबळ पुरावा उपलब्ध झाल्यामुळे आरोपीविरुद्ध न्यायालयात  दोषारोपपत्र दाखल केले.  सरकारतर्फे विशेष सरकारी अभियोक्ता  विनय आर. धुडे यांनी काम पाहिले व यशस्वी युक्तीवाद केला.  सदर प्रकरणात पैरवी सहा. फौजदार अनंत रिंगणे यांनी साक्षदाराना हजर करून मोलाची कामगिरी बजावली. शासनातर्फे एकूण सहा साक्षदार तपासले. पीडिताची बहीण व इतर साक्षदार तसेच सचिव ग्रा.पं. जळगांव यांची साक्ष व सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राहय धरून अतिरिक्त विशेष जिल्हा न्यायाधीश व्ही . टी. सूर्यवंशी यांनी आरोपीस वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली.