पेंच व्याघ्र प्रकल्पातील वाघिणीचा मृत्यू, मागील ५ दिवसात ३ वाघांचे मृत्यू

राज्यात अनेक व्याघ्र प्रकल्प राबवण्यात आले आहेत. त्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पात असलेल्या पूर्व पेंच वन परिक्षेत्रातील सिल्लारी जवळ असलेल्या गाभा क्षेत्रामध्ये पर्यटकांसमोर एका वाघिणीचा मृत्यू झाला आहे.

    राज्यात अनेक व्याघ्र प्रकल्प राबवण्यात आले आहेत. त्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पात असलेल्या पूर्व पेंच वन परिक्षेत्रातील सिल्लारी जवळ असलेल्या गाभा क्षेत्रामध्ये पर्यटकांसमोर एका वाघिणीचा मृत्यू झाला आहे. मागील अनेक दिवसांपासून या प्रकल्पातील वाघांचा मृत्यू होत आहे. वाघिणीच्या मृत्यू मागे काय कारण आहे? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मृत्यू झालेल्या वाघिणीला पोटाचा आजार असल्याचे मत पशुवैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. मागील पाच दिवसांमध्ये या प्रकल्पातील ३ वाघांचा मृत्यू झाला आहे. तर राज्यात तीन महिन्यांमध्ये ११ वाघांचा मृत्यू झाला आहे.

    पर्यटकांसमोर वाघिणीचा मृत्यू झाल्याने सगळ्यांनी हळहळ व्यक्त केली. पेंच प्रकल्पातील सिल्लारी बाजूला पूर्व पेंच रेंजच्या कुटुंबा बिटमध्ये कंपार्टमेंट क्रमांक ५३१ मध्ये वाघिणीच्या मृत्यूची घटना घडली. अचानकपणे नैसर्गिक अधिवासात वाघिणीचा मृत्यू झाल्याने ही घटना वन विभागासाठी धोक्याची मानली जात आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास वाघिणीचा मृत्यू झाला. पर्यटक भिवसेन कुटीजवळील कुटुंबा बिटमध्ये पर्यटनासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना पंप हाऊस जवळ ही वाघीण दिसली.

    मृत्यू झालेल्या वाघिणीमध्ये कोणतीही त्रासदायक लक्षण दिसून आली नव्हती. ही वाघीण पाणी पित होती. त्यानंतर तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. नंतर तिला उलट्या झाल्या आणि ती जमिनीवर निपचित पडली. पर्यटकांनी हे सर्व पाहिल्यानंतर तातडीने मार्गदर्शक आणि जिप्सी चालकांनी वनरक्षक आणि वनपालांना घडलेला सर्व प्रकार सांगून बोलावून घेतले. त्यानंतर मंगळवारी शवविच्छेदन केल्यावर वाघिणीचा मृतदेह जाळण्यात आला. यावेळी संपूर्ण परिसरात नाकाबंदी करण्यात आली होती. मृत्यूच्या आधी वाघिणीला कोणतीही इजा झालेली नव्हती.

    कळमेश्वर वन परिक्षेत्रातील आदासा उपवनक्षेत्र मोहपा, क्षेत्रामधील सावंगी व्यव्हारे या भागात एका विहिरीत पडून बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू झाला होता. हा बछडा मृत अवस्थेमध्ये आढळून आला. चंद्रकांत पांडुरंग श्रीखंड यांच्या विहिरीत हा सर्व प्रकार घडला. बछडा पडण्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली. सकाळी शेतीच्या कामासाठी मजूर शेतावर गेल्यानंतर हा बछडा विहीर पडल्याचे आढळून आले.