हजारो दिव्यांनी उजळला तिकोना किल्ला; बजरंग दलातर्फे दीपोत्सव साजरा

बजरंग दल मावळ तालुक्याच्या वतीने किल्ले तिकोना गडावर दीपावलीनिमित्त दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी असंख्य दिव्यांगी संपूर्ण गड उजळून निघाला होता.

    पुणे : बजरंग दल मावळ तालुक्याच्या वतीने किल्ले तिकोना गडावर दीपावलीनिमित्त दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी असंख्य दिव्यांगी संपूर्ण गड उजळून निघाला होता. गडावरील वितंडेश्वर महादेव मंदिरात अभिषेक, आरती करण्यात आली. या नंतर गडावरील महादेव मंदिर, महाद्वार, बालेकिल्ला, चपेटदान, मारुती या सर्व ठिकाणी दीपावलीनिमित्त दिवे लावून आरास करण्यात आली.

    संपूर्ण भारतभर दीपावली हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अशावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचे गड किल्ले या दीपोत्सवापासून वंचित राहू नयेत याचं संकल्पनेतून बजरंग दलाच्या वतीने प्रतिवर्षी विविध दुर्गांवर दीपोत्सव करण्यात येतो. मावळ तालुक्यातील लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना, राजमाची, कोराईगड येथे दीपोत्सव करण्यात आला.

    मावळातील विविध मंदिरांमध्ये दिव्यांची आरास

    तसेच कार्ला येथील श्री एकविरा माता, महागाव येथील महादेव मंदिर नाणे मावळातील कोंडेश्वर महादेव मंदिर, श्री शेत्र घोरवडेश्वर महादेव मंदिर, संत तुकाराम महाराज मंदिर, श्री वडेश्वर महादेव मंदिर, नऊलाख उंबरे येथील श्रीराम मंदिर अशा विविध ठिकाणी दीपोत्सव साजरा करण्यात आला.

    शिवभक्तांनी दरवर्षी किल्ल्यांवर दीपोत्सव साजरा करावा

    शिवभक्तांनी प्रतिवर्षी दीपावलीनिमित्त शिवाजी महाराजांच्या विविध किल्ल्यांवर येऊन दीपोत्सव करावा असे आवाहन बजरंग कांबळे यांनी केले. यावेळी गोपीचंद महाराज कचरे, सचिन शेलार, संदेश भेगडे, गणेश जुनवणे, भास्कर गोलिया, दीपक अग्रवाल, विश्वास दळवी आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते.