‘सहमतीनं शरीरसंबंधांसाठी कायदेशीर वय कमी करण्याची वेळ’, मुंबई हायकोर्टानं संसदेला दिलाय काय सल्ला?

शरीरसंबंध ठेवण्यासाठी कायदेशीर वयाची मर्यादा कमी करण्याचा महत्त्वाचा सल्ला मुंबई हायकोर्टानं दिलेला आहे. जगातील इतर अनेक देशांनी किशोर वयांच्या मुलांसाठी आणि मुलींसाठी सहमतीनं शरीर संबंध ठेवण्याचं वय कमी केल्याचंही कोर्टानं नमूद केलेलं आहे.

  मुंबई : शरीरसंबंध ठेवण्यासाठी कायदेशीर वयाची मर्यादा कमी करण्याचा महत्त्वाचा सल्ला मुंबई हायकोर्टानं दिलेला आहे. जगातील इतर अनेक देशांनी किशोर वयांच्या मुलांसाठी आणि मुलींसाठी सहमतीनं शरीर संबंध ठेवण्याचं वय कमी केल्याचंही कोर्टानं नमूद केलेलं आहे. आपल्या देशानं आणि संसदेनं जगातील झालेला हा बदल लक्षात घएऊन, यावर विचार करण्याची वेळ आल्याचं कोर्टानं म्हटलय.

  भारतात १९४० ते २०१२ या काळात सहमतीनं शरीर संबंध ठेवण्याच्या वयाची मर्यादा १६ वर्ष होती. पॉक्सो कायदा आल्यानंतर ही मर्यादा १८ वर्ष करण्यात आलेली आहे. जागतिक पातळीचा विचार केला तर १८ वर्षांची मर्यादा ही अधिक असल्याचं सांगण्यात येतंय.

  पॉक्सोच्या वाढत्या प्रकरणांवर कोर्टानं व्यक्त केली चिंता 

  मुंबई हायकोर्टाच्या न्यायमूर्ती भारती डोंगरे यांनी त्यांच्या खंडपीठासमोर सुरु असलेल्या एका सुनावणीवेळी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्ह्यांच्या प्रकरणात होत असलेल्या वाढीबाबत चिंता व्यक्त केली आहे. अशा प्रकरणांत आरोपींना जेव्हाही शिक्षा देण्यात येते, त्यावेळी सहमतीनं शरीर संबंध केले होते, असं हे आरोपी सांगत असल्याचं निरीक्षणही त्यांनी नोंदवलेलं आहे.

  २० वर्षांच्या एका तरुणानं १७ वर्ष आणि २६४ दिवस वय असलेल्या तरुणीशी शरीर संबंध ठेवले तर त्या तरुणानं बलात्कार केला असं मानण्यात येतंय. तरुणीनं हे शरीर संबंध सहमतीनं केले असले आणि त्याची कबुली दिली असली तरी या प्रकरणात तरुण हा बलात्काराचा आरोपी ठरतोय.

  अल्पवयीन मुलीशी सहमतीनं संबंध ठेवलेल्या आरोपीला केलं मुक्त

  हायकोर्टानं ही टिप्पणी एका प्रकरणाच्या सुनावणीवेळी केली. यात २५ वर्षांच्या एका तरुणानं फेब्रुवारी २०१९ साली दिलेल्या विशेष कोर्टाच्या एका निर्णयाला आव्हान दिलं होतं. १७ वर्षांच्या मुलीसी संबंध ठेवल्या प्रकरणी या तरुणाला दोषी ठरवण्यात आलं होतं.

  या प्रकरणात तरुण आणि त्या मुलीनं सहमतीनं संबंध ठेवले होते, अ्सं कोर्टात सांगितंलय. विशेष कोर्टानं तरुणाला दिलेल्या शिक्षेतून मुंबई हायकोर्टानं त्याला दिलासा देत, त्याची या आरोपांतून मुक्तता केलेली आहे. या आरोपीला तातडीनं जेलमधून सोडण्याचे आदेशही देण्यात आलेत.

  सहमतीनं शरीर संबंध ठेवण्याचं वय लग्नापेक्षा वेगळं करावं 

  सहमतीनं शरीर संबंध ठेवण्याचं वय हे लग्नाच्या वयापेक्षा वेगळं करण्याची गरज असल्याचं मत कोर्टानं नोंदवलेलं आहे. जगातील अनेक देशात हे वय १४ ते १६ वर्ष असल्याचंही सांगण्यात आलंय. जर्मनी, इटली, पोर्तुगाल, हंगेरी या सारख्या देशांत सेक्ससाठी १४ वर्षांचं वय हे योग्य असल्याचं मानण्यात येतंय. लंडन आणि वेल्समध्ये हे वय १६ वर्ष आहे. तर जपानमध्ये १३ वर्ष आहे.