‘पंतप्रधान मोदींच्या अपमानाचा बदला घेण्याची वेळ, त्यामुळे सर्वांनीच…’; बारामतीत चंद्रकांत पाटलांचं आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रत्येक बुथवर किमान ३७० मते महायुतीच्या उमेदवाराला मिळाली पाहिजेत, हा जो संदेश दिला आहे. त्यानुसार, आजपासूनच बूथनिहाय आपल्या उमेदवाराला अधिकाधिक मते कशी मिळतील, या दृष्टीने प्रयत्न करण्याचे आवाहन पाटील यांनी केले.

    बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांना शब्द देऊन ऐन वेळी माघार घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केलेल्या अपमानाचा व फसवणुकीचा बदला घेण्याची संधी आली आहे. त्यामुळे सर्वांनीच घड्याळ या चित्रासमोरील बटण दाबून नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान करण्यासाठी बारामतीत महायुतीच्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

    बारामतीत महायुतीची समन्वय बैठक सुनेत्रा पवार यांच्यासह महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रविवारी (दि.१७) बारामतीत पार पडली. यावेळी चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी तिन्ही घटक पक्षांनी एकत्र काम करावे. ज्या कार्यकर्त्यांना विरोधकांचे काम करायचे आहे, त्यांनी पक्ष सोडून मगच ते काम करा. त्यांना पुन्हा पक्षात प्रवेश मिळणार नाही. रात्रीच्या अंधारात विरोधकांचे काम करायचे व दिवसा आमच्याबरोबर राहायचे, आमचे सरकार आल्यानंतर योजनांचा फायदा घेण्यासाठी आमच्याकडे यायचे हे अजिबात चालणार नाही. बांधिलकी व सांघिक भावना महत्त्वाची आहे’.

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रत्येक बुथवर किमान ३७० मते महायुतीच्या उमेदवाराला मिळाली पाहिजेत, हा जो संदेश दिला आहे. त्यानुसार, आजपासूनच बूथनिहाय आपल्या उमेदवाराला अधिकाधिक मते कशी मिळतील, या दृष्टीने प्रयत्न करण्याचे आवाहन पाटील यांनी केले.

    दरम्यान, प्रत्येक बुथवर ३७० मते कशी मिळवायची याची आकडेवारी देखील त्यांनी याप्रसंगी कार्यकर्त्यांना सांगितले. यंदाच्या निवडणुकीत भाजपचे ३७० तर एनडीएचे ४०० खासदार निवडून येण्याच्या दृष्टीने देशभरात सांघिक प्रयत्न सुरू आहेत. लोकसभेच्या निवडणुकीसाठी अवधी असून, प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय समन्वयाची बैठक देखील घेतली जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

    यावेळी आमदार राहुल कुल, भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, संदीप खर्डेकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, रुपाली चाकणकर, सुरेश घुले, बाळासाहेब गावडे, नवनाथ पडळकर, जालिंदर कामठे, पृथ्वीराज जाचक, वैशाली नागवडे, सुरेंद्र जेवरे, पांडुरंग कचरे, बाबाराजे जाधवराव, दिगंबर दुर्गाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.