‘पीआरसी’ला खुश करण्यासाठी ३ कोटींची वसुली; आमदार काळेंनी लावले कानाला हात

झेडपी अधिकाऱ्यांवरील प्रशासकीय कारवाई टाळण्यासाठी पीआरसी कमिटीला खुश करण्यासाठी ३ कोटींची वसुली करण्यात आली आहे का? असा प्रश्न विचारताचं आमदार विक्रम काळे (MLA Vikram Kale) यांनी कानाला हात लावले.

    सोलापूर : झेडपी अधिकाऱ्यांवरील प्रशासकीय कारवाई टाळण्यासाठी पीआरसी कमिटीला खुश करण्यासाठी ३ कोटींची वसुली करण्यात आली आहे का? असा प्रश्न विचारताच आमदार विक्रम काळे (MLA Vikram Kale) यांनी कानाला हात लावले.

    याबाबत माहिती अशी की, झेडपीतील कर्मचारी अधिकाऱ्यांकडून वर्गणी गोळा केल्याची चर्चा मागील दोन-तीन दिवसांपासून रंगली होती. समितीच्या दौऱ्यातील शेवटच्या दिवशी अध्यक्ष संजय रायमुलकर, आमदार विक्रम काळे, आमदार अनिल पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली.

    या पत्रकार परिषदेस मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी (CEO Dilip Swami) व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांची उपस्थिती होती.

    याचवेळी पत्रकारांनी पंचायतराज समितीसाठी अधिकारी-कर्मचार्‍यांकडून गोळा केलेली वर्गणी ही तब्बल तीन कोटीपर्यंत गेली असून, तुमच्या नावावर ते सर्व केले जाते, असा प्रश्न केला असता, बापरे तीन कोटी असे म्हणून आमदार विक्रम काळे यांनी कानाला हात लावले. आकडा ऐकायला चांगला वाटतो. परंतु ही वस्तुस्थिती आहे.

    आमच्या नावावर तिकिटे फाडली जातात. आमचा उद्देश एकच आहे, शासनाच्या ज्या योजना राबवल्या जातात, त्या योग्य पद्धतीने लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या का नाही, त्याचा निधी खर्च होतो का नाही ते पाहणे आमचे काम असून, जिथे अधिकारी कर्मचारी चुकतात, त्यांच्यावर आम्ही कारवाई करतो, असेही ते म्हणाले.