देशात हुकूमशाहीला आळा घालण्यासाठी संविधान अबाधित ठेवावेच लागेल – जेष्ठ लेखिका उर्मिलाताई पवार

अपरांत साहित्य कला प्रबोधिनी आयोजित दुसऱ्या सम्यक साहित्य कला संगीतीच्या अध्यक्षीय भाषणात केले प्रतिपादन!

    देशात हुकूमशाहीला आळा घालायचा असेल तर प्राणपणाने भारतीय संविधान अबाधित ठेवावे लागेल. त्यासाठी संघर्ष करावा लागेल. इतिहासातील घटनांमधून अनेक गोष्टी जाणीवपूर्वक अंगीकाराव्या लागतील. धर्म आणि जाती व्यवस्थेने माणसांची मने दुभंगून ठेवलेली आहेत. त्यांना एकत्र आणण्याचे सामर्थ्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातच आहे. म्हणून ते विचार घेऊन उभा राहिलेला प्रत्येक माणूस हा ‘आंबेडकरी विचारांचा माणूस ‘ आहे. मग तो कोणत्याही जाती धर्माचा असू देत. याचे भान आपण सतत ठेवले पाहिजे, असे स्पष्ट प्रतिपादन दुसऱ्या सम्यक साहित्य कला संगीतच्या अध्यक्षा ज्येष्ठ लेखिका उर्मिलाताई पवार यांनी येथे केले.

    संपूर्ण कोकणातील आंबेडकरी, पुरोगामी, परिवर्तनवादी चळवळीतील साहित्यिक, कलावंतांची अग्रगण्य संस्था असलेल्या अपरांत साहित्य कला प्रबोधिनीच्या वतीने दुसरी सम्यक साहित्य कला संगीती नुकतीच कणकवली येथे आ सो शेवरे साहित्य नगरी, मराठा नाट्यगृहात पार पडली. त्यावेळी अध्यक्ष भाषण करताना उर्मिलाताई बोलत होत्या. या संगीतीचे उद्घाटन हिंदीतील ज्येष्ठ साहित्यिक मोहनदास नैमिषराय यांच्या हस्ते करण्यात आले. तर या संगीतीच्या स्वागताध्यक्षपदी डॉ. रवींद्र जाधव हे होते. उद्घाटनवेळी विचार मंचावर प्रबोधिनीचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक ज. वि. पवार, कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, कार्याध्यक्ष प्रा. आनंद देवडेकर, सरचिटणीस सुनील हे, संदेश पवार, कोषाध्यक्ष दीपक पवार, सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुंबरकर, कार्याध्यक्ष इंजिनियर अनिल जाधव, सरचिटणीस राजेश कदम, कोषाध्यक्ष जनिकुमार कांबळे, प्रबोधिनीच्या उपाध्यक्ष प्रा. आशालता कांबळे, भावेश लोखंडे, प्रा. डॉ. संजय खैरे, संजय गमरे आदी उपस्थित होते.

    उमिलाताई आपल्या भाषणात पुढे म्हणाल्या, संपूर्ण जगभरातच आज अराजकतेचे, हिंसा आणि अस्थिरतेचे वातावरण आहे. माणुसकीच पायदळी तुडवली जात आहे. रशिया – युक्रेन, इस्राईल – गाझापट्टी ही युद्ध, मणिपूरच्या वांशिक दंगली, यातल्या फॅसीझमचा निषेध आणि त्यात नाहक बळी गेल्या विषयी करुणा आपण व्यक्त केली पाहिजे. जिथे हिंदू पोचतो, तिथे जात पोहोचते. या न्यायाने युरोप अमेरिकेतही जातीय आंदोलने होत आहेत. जातीयवादाला पाठिंबा देणारे येस आणि नकार देणारे नो फलक तिथे झळकावत आहेत. राजरत्न आंबेडकर, सुरज येंगडे यासारखे आंबेडकरवादी युवा विचारवंत समतेचा लढा शांती आणि अहिंसेच्या मार्गाने लढवत आहेत. आंबेडकरी साहित्य ही सुद्धा एक अशीच लढाऊ चळवळ आहे. बाबासाहेबांनी दाखवलेल्या शांतीच्या मार्गाने आपल्यालाही पुढे जायचे आहे. नव्या दिशेने निघालेले सर्व अपरांतातील साहित्य, कलावंतही आपले साहित्य अनेक भाषांमध्ये आणि जागतिक विचारमंचावर नेतील आणि आंबेडकरी साहित्याचा परीघ आपल्या बोलीभाषा आणि भौगोलिक जाणीवांमधून अधिकच विस्तारतील याची मला खात्री आहे, असे सांगितले.

    संगीतीचे उद्घाटक ज्येष्ठ हिंदी साहित्यिक मोहनदास नैमिषराय आपल्या भाषणात म्हणाले, लेखकांनी आपल्या कोशातून बाहेर पडले पाहिजे. वेगवेगळ्या प्रांतात, वेगवेगळ्या भाषिक प्रदेशात फिरले पाहिजे. सर्व घडामोडींचे निरीक्षण केले पाहिजे. जाती-धर्माच्या पलीकडे पाहता आले पाहिजे आणि त्यातून समाजात दिसणारे दुःख, दैन्य, प्रश्न आपल्या साहित्यातून अग्रक्रमाने मांडले पाहिजेत. नकारात्मक बाबी सोडून देऊन सकारात्मक बाबी साहित्यातून मांडल्या पाहिजेत. महाराष्ट्राच्या बाहेर सर्व क्षेत्रात काय घडते आहे? याचे भान लेखकांनी ठेवून काम केले पाहिजे. लेखणीला तलवार बनवून सामाजिक प्रबोधन व परिवर्तनाला मदत केली पाहिजे, असे परखड विधान त्यांनी केले. तसेच महाराष्ट्राच्या आंबेडकरी चळवळीविषयी कृतज्ञता व्यक्त करताना ते म्हणाले की, मी जर महाराष्ट्रात आलो नसतो तर प्रखर आंबेडकरवादी झालो नसतो. माझ्यातला प्रखर आंबेडकरवादी हा महाराष्ट्राच्या भूमीने निर्माण केला आहे, असे सांगितले.

    यावेळी जवि पवार, अजयकुमार सर्वगोड, डॉ. श्रीधर पवार, प्रा. आनंद देवडेकर, प्रा. राजेंद्र मुंबरकर आदींनी आपले समयोचित विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरचिटणीस संदेश पवार यांनी संस्थेच्या स्थापना व आजवरच्या वाटचालीचा समग्र आढावा घेतला. या कार्यक्रमात स्वागत अध्यक्ष डॉ. रवींद्र जाधव यांना त्यांच्या समाजकार्यासाठी अपरान्त भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते विनायक मिठबावकर यांचा त्यांच्या चळवळीतील योगदानाबद्दल विशेष सत्कार ज्येष्ठ साहित्यिक जवी पवार यांच्या हस्ते करण्यात आला. संगीतीच्या निमित्ताने अपरान्त संगीती विशेषांक यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी दीप प्रज्वलन करण्यात आले. संविधान उद्देशिकेचे वाचन अरुण कदम यांनी तर वंदन शाहीर दीपक पवार यांनी सादर केले. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी जवी पवार यांच्या गोधडी या गीत वादनाने सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाला बहुसंख्य लोक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश कदम व आभार विठ्ठल कदम यांनी मानले.