आंदोलन स्थगित करून राज्य शासनाला सहकार्य करावे; शंभूराज देसाई यांचे मनोज जरांगे यांना आवाहन

मनोज जरांगे पाटील यांनी संयम दाखवावा व मुंबईतील २० जानेवारी रोजी होणारे प्रस्तावित आंदोलन स्थगित करून सहकार्य करावे, असे कळकळीचे आवाहन शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.

  सातारा : राज्य शासन मराठा आरक्षणाच्या संदर्भात प्रचंड सकारात्मक आहे. कोणत्याही जातीचे आरक्षण काढून मराठा समाजाला दिले जाणार नाही. घाई गडबडीत दाखले न देता ५४ लाख कुणबी नोंदीच्या संदर्भात कायदेशीर प्रक्रिया तपासल्या जात आहेत. मराठा आरक्षणाचे ९० टक्के काम झाले आहे, दहा टक्के उरले आहे, त्या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी संयम दाखवावा व मुंबईतील २० जानेवारी रोजी होणारे प्रस्तावित आंदोलन स्थगित करून सहकार्य करावे, असे कळकळीचे आवाहन राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत केले.

  मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य शासनाने अद्याप ठोस भूमिका घेतली नसल्याच्या निषेधार्थ मनोज जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदानावर २० जानेवारीपासून बेमुदत आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. या आंदोलनामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा बांधव मोठ्या प्रमाणावर सहभागी होणार आहेत. मुंबईत कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये, याकरिता शंभूराज देसाई यांनी राज्य शासनाच्या वतीने साताऱ्यात येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन बाजू मांडली.

  शंभूराज देसाई म्हणाले, महाराष्ट्रामध्ये ५४ लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यांना तात्काळ घाईगडबडीत आरक्षण आणि त्याचे दाखले देणे चुकीचे ठरेल, त्यासाठी घटनात्मक प्रक्रिया राबवली जात आहे. या प्रक्रियेला कायदेशीर आव्हान मिळाल्यास संपूर्ण प्रक्रिया थांबून जाईल. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहे त्यांनी या प्रश्नाचा सखोल अभ्यास केला आहे मात्र आतापर्यंत त्यांनी जो संयम दाखवला तो थोडा आणखी दाखवावा व २० जानेवारी रोजी त्यांनी पुकारलेले मुंबईतील आंदोलन तात्काळ स्थगित करावे, कारण मराठा बांधव मोठ्या प्रमाणावर मुंबईत दाखल झाल्यास येथील कायदा सुव्यवस्थेची अडचण होऊ शकते. राजधानी मुंबई ही घड्याळाच्या काट्यावर धावणारी नगरी आहे येथील नागरिकांची दळणवळणाची तसेच इतर अडचणी झाल्यास या प्रकरणाला वेगळे वळण लागू शकते त्यामुळे इतके दिवस संयम बाळगलेल्या जरांगे यांनी राज्य शासनाच्या सकारात्मक प्रयत्नांना प्रतिसाद देऊन २० जानेवारीचे आंदोलन तत्काळ स्थगित करावे, असे आवाहन शंभूराज देसाई यांनी केले.

  सगेसोयरे या शब्दाबाबत अध्यादेश काढण्याबाबत सरकार सकारात्मक असून त्याकरता तीन निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमण्यात आली आहे त्यांचा सल्ला घेऊन तो अहवाल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला जाईल आणि अध्यादेशासंबंधात कायदेशीर प्रक्रिया सुरू ठेवली आहे. जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन करून येथील लोकांची गैरसोय होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्याबाबत पुनर्विचार करावा. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारने आत्तापर्यंत संपूर्णपणे सकारात्मक भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः मराठा आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात चर्चा करण्यासाठी राजशिष्टाचार सोडून अंतरवाली सराटी येथे गेले होते. राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेले होते. सरकार मराठा आरक्षणाच्या विरोधक नाही. इतर कोणाच्याही आरक्षणाला धक्का लावला जाणार नाही. सगेसोयरे या शब्दाबाबत जरांगे यांच्या आणखी काही ज्या सूचना असतील त्या सुद्धा विचारात घेतल्या जातील. समाजातील अपप्रवृत्ती विनाकारण परिस्थिती खराब करतात आणि नंतर ती हाताबाहेर जाते. असंही ते म्हणाले.

  माझ्यावर ट्रॅप लावला जात आहे, असा आरोप जरांगे पाटील यांनी केला होता त्याला उत्तर देताना शंभूराज देसाई म्हणाले, राज्य मंत्रिमंडळातील कोणीही अशा पद्धतीचे काम निश्चितच करणार नाही, राज्य शासनाने संपूर्ण प्रक्रिया पारदर्शी पद्धतीने राबवलेली आहे त्यामुळे ट्रॅप वगैरे असा कोणताही प्रकार नसून, मनोज जरांगे पाटील यांनी त्यांना मिळालेल्या माहितीची खात्री करावी, जरांगे हे आमचे मित्र असून त्यांनी आमच्याशी चर्चा करावी त्या ट्रॅप प्रकरणाची आम्ही जरूर शहनिशा करू मात्र मराठा आरक्षणाच्या संदर्भातील आमच्या भूमिकेविषयी संशय घेऊ नये, जरांगे यांनी आपले आंदोलन रद्द करून राज्य शासनाने सहकार्य करावे .

  राज्यातील ५४ लाख कुणबी लोकांना प्रमाणपत्र देण्याची मागणी जरांगे यांनी केली आहे मात्र ती प्रमाणपत्र देताना फेर तपासणी रीतसर काही कायदेशीर प्रणाली अस्तित्वात आहे. घाईघाईने प्रमाणपत्र दिल्यास त्या प्रक्रियेला कोर्टात जर आव्हान मिळाले तर संपूर्ण आरक्षण प्रक्रियेची अडचण होऊ शकते. ही बाब जरांगे यांनी ध्यानात घ्यावी. मराठा आरक्षण प्रक्रिया ९०% पुढे आलेली आहे. दहा टक्के प्रक्रिया शिल्लक आहे त्याबाबत जरांगे यांनी संयम पाळावा, अशी सुद्धा विनंती शंभूराजे यांनी विनंती केली. जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नात नकारात्मक भूमिका ठेवू नये, जरांगे यांच्या सूचनेप्रमाणेच मराठा आरक्षणाची प्रक्रिया सुरू आहे त्यांनी या घटनेकडे सकारात्मक रित्या बघावे, सरकार वेळ काढूपणा करत नाही हा जरांगे यांचा आरोप शंभुराज देसाई यांनी खोडून काढला.