पुणे लष्कर परिसरातील पीएमपी बस अपघातातील मृताच्या वारसांना; अडीच कोटी रुपयांची नुकसानभरपाई

    पुणे : लष्कर परिसरात पीएमपी बसच्या धडकेत मृत्यू झालेल्या मोटारचालकाच्या कुटुंबीयांना अडीच कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मोटार अपघात न्यायाधिकरणाचे सदस्य, न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांनी हे आदेश दिले आहेत.

    गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू

    चालक धीरेन शिवप्रसाद तिवारी ९ जून २०१८ रोजी लष्कर भागातील पूलगेट परिसरातून निघाले होते. त्यावेळी भरधाव पीएमपी बसने मोटारीला धडक दिली. अपघातात तिवारी यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तिवारी यांच्या कुटुंबीयांनी बसचालक रमेश वाघमारे, पीएमपी प्रशासन, विमा कंपनीविरुद्ध ॲड. संजय गायकवाड, ॲड. अस्लम पीरजादे, ॲड. प्रसाद शिवरकर, ॲड. सबीना शेख यांच्या मार्फत दावा दाखल केला होता. मोटार अपघात न्यायाधिकरणात दाव्यावर सुनावणी झाली.

    अडीच कोटी रुपयांची नुकसान भरपाई

    अपघात पीएमपी बसचालकाच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचे निरीक्षक न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांनी नोंदविले. अपघातात मृत्यू झालेले धीरेन यांचे वय आणि त्यांचे उत्पन्न व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबीय या बाबी विचारात घेऊन न्यायाधिकरणाने अडीच कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. अपघात घडल्यानंतर दरमहा ७ टक्के व्याजदराने नुकसान भरपाईची रक्कम मृताच्या कुटुंबीयांना परत करण्यात यावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.