uddhav thackeray and eknath shinde

अन्यायावर लाथ मारा हे शिवसेनेचं ब्रीदवाक्य आहेच. ८० टक्के समाजसेवा आणि २० टक्के राजकारण हे आपलं ब्रीद आहेच. आपल्याला बाळासाहेब ठाकरेंनी हीच शिकवण दिली आहे. ही शिकवण मानणारे अस्सल आणि कट्टर शिवसैनिक माझ्यासोबत ठामपणे उभे आहेत. विकाऊ होते ते विकले गेले.

    ठाणे-  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील बालेकिल्ल्यात आज ठाकरे गटातर्फे आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबीराल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष होते.  त्यावेळी आपल्या भाषणात त्यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्यासोबत गेलेल्या गटावर टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले जे अस्सल शिवसैनिक (Shivsainik) निखाऱ्यासारखे माझ्यासोबत राहिले आहेत हे निखारेच उद्या राजकारणात मशाल पेटवणार आहेत असं म्हणत ठाण्यात उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटासोबत गेलेल्या सगळ्यांना टोला लगावला आहे. तसंच महाराष्ट्रात जे काही घडलं त्यामुळे महाराष्ट्राची बदनामी झाली असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर मी लवकरच ठाण्यात सभा घेणार आहे असंही उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं आहे.

    उद्धव ठाकरे म्हणाले, आज मी फक्त आरोग्य शिबिरासाठी आलो आहे. खासदार राजन विचारे यांनी बोलावलं म्हणून आलो. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यायला येथे आलो. पण, येत्या काही दिवसांत ठाण्यातील राजकीय नेत्यांची आरोग्याची काळजी घ्यायला येणार आहे, असं ठाकरे म्हणाले. राजन विचारे आणि त्यांच्यासह येथे अनेक शिवसैनिक उपस्थित आहेत. काहीजण विकले गेले. काय भावाने विकले गेले हे सांगायची गरज नाही, असं उद्धव ठाकरेंनी म्हणताच तिथे ५० खोकेंच्या घोषणांनी परिसर दणाणला गेला. यावरून उद्धव ठाकरेंनी एक किस्सा उपस्थितांशी शेअर केला.

    अन्यायावर लाथ मारा हे शिवसेनेचं ब्रीदवाक्य आहेच. ८० टक्के समाजसेवा आणि २० टक्के राजकारण हे आपलं ब्रीद आहेच. आपल्याला बाळासाहेब ठाकरेंनी हीच शिकवण दिली आहे. ही शिकवण मानणारे अस्सल आणि कट्टर शिवसैनिक माझ्यासोबत ठामपणे उभे आहेत. विकाऊ होते ते विकले गेले. काय भाव ते तुम्हाला माहित आहे. असं उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात म्हणतात उपस्थितांनी ५० खोके एकदम ओके या घोषणा दिल्या. त्यानंतर ही घोषणा राहुल गांधींपर्यंत जम्मूलाही पोहचली आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.