आज पुणे बलात्काराने पुन्हा हादरले असते…पण, तिच्या रडण्याचा आवाज आला अन्…

आज पुन्हा एकदा पुणे बलात्काराच्या घटनेने हादरले असते पण, एका जागृत व सतर्क नागरिकामुळे फुगेविक्रेत्या महिलेच्या ५ वर्षीय चिमुकलीवरील बलात्काराचा प्रयत्न फसला. नशेच्या धुंदीत असणाऱ्या बेवड्या ३५ वर्षीय नराधमाने आईच्या खुशीत झोपलेल्या या चिमुरडीचे झोपेत अपहरण करून तिला उचलून नेले आणि तिच्यावर पडीक बांधकामाच्या बेसमेंटमध्ये अत्याचाराचा प्रयत्न केला. मात्र, या सतर्क नागरिकाने चिमुरडीच्या रडण्याचा आवाज ऐकून तिचा माग काढला अन् बलात्काराचा प्रयत्न फसला.

     अक्षय फाटक (प्रतिनिधी) पुणे : आज पुन्हा एकदा पुणे बलात्काराच्या घटनेने हादरले असते पण, एका जागृत व सतर्क नागरिकामुळे फुगेविक्रेत्या महिलेच्या ५ वर्षीय चिमुकलीवरील बलात्काराचा प्रयत्न फसला. नशेच्या धुंदीत असणाऱ्या बेवड्या ३५ वर्षीय नराधमाने आईच्या खुशीत झोपलेल्या या चिमुरडीचे झोपेत अपहरण करून तिला उचलून नेले आणि तिच्यावर पडीक बांधकामाच्या बेसमेंटमध्ये अत्याचाराचा प्रयत्न केला. मात्र, या सतर्क नागरिकाने चिमुरडीच्या रडण्याचा आवाज ऐकून तिचा माग काढला अन् बलात्काराचा प्रयत्न फसला. बेवड्या नराधमापासून चिमुरडीची सुखरूप सुटका करत त्याला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. या खळबळजनक घटनेने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, बंद पडक्या इमारतीचा पुन्हा एकदा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

    नवनाथ अडागळे असे या अत्याचाराला लगाम लावण्यात आणि नराधम्याला रंगेहात पकडणाऱ्या सतर्क नागरिकाचे नाव आहे. त्यांचे पोलीस व नागरिकांनी विशेष कौतुक करून आभार मानले आहेत. पोलिसांनी राम टेकबहादुर (वय ३५, रा. वडगाव शेरी) याला अटक केली आहे. याबाबत येरवडा पोलीस ठाण्यात ४० वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे.

    संबंधित महिला रस्त्याच्या कडेला फुगे विक्री आणि हेल्मेट विक्रीची कामे करते. तिचा पती आणि तीन मुली अस पाच जणांच कुटूंब दिवसभर शहरातील विविध भागात विक्रीसाठी फिरत असते. रोजच्या राहण्याचा ठिकाणा त्यांचा खडकी परिसरातील आहे. मात्र, २६ नोव्हेंबर रोजी पतीशी भांडण झाल्याने ही महिला रोजच्या ठिकाण्यावर गेली नाही. तीनही मुलीला घेऊन ती माहित असणाऱ्या येरवड्यातील ट्रम्प टॉवर समोरील मोकळ्या मैदानातील बंद पडलेल्या बांधकामावर आली. तीनही मुलींना घेऊन ती एकटीच या ठिकाणी झोपली होती.
    मात्र, रात्री आकरा सुमारास दारूच्या नशेत धुंद असणाऱ्या राम टेकबहादुरने या माय-लेकींना पडीक इमारतीत झोपलेले पाहिले. त्याने आईच्या खुशीत झोपलेल्या तीन मुलींपैकी यातील ५ वर्षीय मुलीला झोपेतच उचलून नेले. तो बेसमेंटमध्ये तिला घेऊन गेला आणि तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला. मात्र, चिमुरडी रडू लागली. त्याचवेळी नवनाथ अडागळे हे येथून जाताना त्यांना पडीक इमारतीमधून मुलीच्या रडण्याचा आवाज आला. त्यांनी माग काढत बेसमेंटमध्ये धाव घेत पाहणी केली असता राम टेकबहादुर अत्याचार करत असल्याचे दिसले. त्यांनी तत्काळ चिमुरडीची सुखरूप सुटका केली आणि राम टेकबहादुरला पकडून पोलिसांना घटनेची माहिती दिली.

    येरवडा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन या नराधम राम टेकबहादुरला ताब्यात घेतले. नवनाथ यांच्या सतर्कतेमुळे चिमुरडीवरच्या अत्याचाराचा प्रयत्न फसला आहे. पोलीस आणि नागरिकांनी नवनाथ यांचे विशेष कौतुक करत त्यांचे आभार मानले आहेत. दुसरीकडे सांस्कृत शहर असणारे पुणे पुन्हा एकदा बलात्काराच्या एका घटनेने वाचले गेले आहे.