ʻतेराʼला तीन तेरा कोणाचेॽ लोकसभेचा सातबारा कोणाच्या नावावर होणार?

दोन राष्ट्रवादी काँग्रेस, दोन शिवसेना अशा अभूतपूर्व परिस्थितीत होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस तसेच वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम या पक्षांमध्ये पुणे शहर लोकसभा मतदारसंघात लढत होत असून, चौरंगी दिसणाऱ्या लढतीत कोणाचे तीन तेरा वाजणार याविषयी उत्सुकता आहे.

  पुणे / दीपक मुनोत : दोन राष्ट्रवादी काँग्रेस, दोन शिवसेना अशा अभूतपूर्व परिस्थितीत होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस तसेच वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम या पक्षांमध्ये पुणे शहर लोकसभा मतदारसंघात (Pune Lok Sabha) लढत होत असून, चौरंगी दिसणाऱ्या लढतीत कोणाचे तीन तेरा वाजणार याविषयी उत्सुकता आहे.

  लोकसभा निवडणुकीच्या चवथ्या टप्प्यात, १३ मे २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत पुण्यात मतदान होणार आहे. रणरणत्या उन्हातही बारामती लोकसभा मतदारसंघात काही तालुक्यात रांगा लागल्या होत्या. तसेच चित्र पुण्यात दिसते की अवकाळी पावसाचा दणका मतदानाला बसतो याची चिंता राजकीय पक्षांच्या नेत्यांना आहे. तेरा तारखेला होणाऱ्या मतदानात ‘तीन तेरा वाजणे’ वाक्प्रचार म्हणजे नुकसान होणे, सत्यानाश होणे असा अर्थ आहे. तीन आणि तेरा हे दोन्ही आकडे अशुभ मानले जातात.

  पुणे शहर लोकसभा मतदारसंघाला लाटेवर स्वार होणारे शहर अशी वेगळी ओळख आहे. या शहर लोकसभा मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत महायुतीकडून भाजपचे मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि वंचित विकास आघाडीकडून वसंत मोरे तर एम आय एम कडून अनिस सुंडके रिंगणात आहेत. यापैकी कोणातरी तिघांचे तीन तेरा वाजणार हे निश्चित आहे.

  शिवसेनेत फूट पडल्यानंतर पुण्यात एकनाथ शिंदे गटाचे प्रभावी अस्तित्व नाही. उध्दव ठाकरे गटाची सक्रियता बऱ्यापैकी असून तिचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो. तसेच वसंत मोरे यांनी मराठा आरक्षणाचे समर्थन केल्याने मराठा मते काही प्रमाणात त्यांना मिळू शकतात. अनिस सुंडके यांनी उशिरा उमेदवारी जाहीर केली. त्यांचा सार्वत्रिक प्रचारात फारसा ठसा नाही. ब्राह्मण समाजाच्या मतांविषयी ठोस अंदाज बांधता येत नाही. कारण या निवडणुकीतही भारतीय जनता पक्षाने ब्राह्मणेतर उमेदवार उभा केला आहे.

  १९८० पासून ४ वेळा काँग्रेस आणि ३ वेळा भाजपचा उमेदवार निवडून देणाऱ्या पुणे लोकसभा मतदारसंघात १९८० मध्ये काँग्रेसचे विठ्ठलराव गाडगीळ खासदार म्हणून निवडून आले. ते सलग तीन वेळा खासदार होते. गाडगीळ यांनी १९८४ आणि १९८९ च्या निवडणुकाही जिंकल्या. १९९१ मध्ये भारतीय जनता पक्षाचा प्रथमच विजय झाला आणि ल.सो. तथा अण्णा जोशी खासदार झाले. १९९६ मध्ये काँग्रेसचे सुरेश कलमाडी, १९८८ मध्ये काँग्रेसचे विठ्ठल तुपे, १९९९ मध्ये भाजपचे प्रदीप रावत, २००४ आणि २००९ मध्ये काँग्रेसचे सुरेश कलमाडी विजयी झाले होते. २०१४ मध्ये भाजपचे अनिल शिरोळे निवडून आले. २०१९ मध्ये भाजपचे गिरीश बापट निवडून आले.

  २९ मार्च २३ रोजी गिरीश बापट यांचे निधन झाले. त्यानंतर काही कारणांनी १४ महिन्यात पोटनिवडणूक होऊ शकली‌ नव्हती. कसबा पोटनिवडणुकीचा वाईट अनुभव असल्यामुळे लोकसभा निवडणूक होऊ नये यासाठी भारतीय जनता पक्षाने बरेच प्रयत्न करणे हाच योग्य उमेदवार नसल्याचा परिणाम असल्याची टीका त्यावेळी झाली होती.

  दरम्यान, २०१४ च्या मोदी लाटेत अनिल शिरोळे यांनी काॅंग्रेसचे डॉ. विश्वजीत पतंगराव कदम यांचा पराभव केला. शिरोळे यांनी ३ लाख १५ हजार मतांनी निवडणूक जिंकली. त्यांना ५ लाख ६९ हजार मते तर डॉ. कदम यांना २ लाख ५४ हजार मते मिळाली. २०१९ मध्ये गिरीश बापट यांना ६ लाख ३२ हजार पेक्षा अधिक मते मिळून ते जिंकले. गिरीश बापट यांनी ३ लाख २४ हजार मतांची आघाडी घेतली. तर त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या मोहन जोशी यांना ३ लाख ८ हजार मते मिळाली.

  यंदा मोदी लाट नसल्याचा आणि राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनंतर काॅंग्रेस मध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचा परिणाम सुध्दा काही अंशी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.