
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा आजचा नियोजित सोलापूर दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा निरीक्षक शेखर माने यांनी ही माहिती दिली आहे.
सोलापूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा आजचा नियोजित सोलापूर दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा निरीक्षक शेखर माने यांनी ही माहिती दिली आहे. मुंबईत इंडिया आघाडी बैठकीला उपस्थित राहण्यासाठी शरद पवार यांचे आजचे माढा आणि पंढरपूर भागातील सर्व दौरे रद्द करण्यात आलेत. काही वेळातच शरद पवार गोविंद बागेतून पुण्याकडे रवाना होणार आहेत.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन्ही नेते आज माढा आणि पंढरपूर दौर्यावर होते. शरद पवार माढा तालुक्यातील कापशी येथील शेतकरी मेळाव्याला सकाळी १० वाजता उपस्थित राहणार होते. त्यानंतर ते दुपारी दोन वाजता पंढरपूर येथे होणाऱ्या पदाधिकारी मेळाव्याला हजेरी लावणार होते. मात्र त्यांचे हे सर्व दौरे आता रद्द झालेत.
अजित पवारांच्या दौऱ्याला विरोध
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यात कोणताही बदल झालेला नाही. माढयाचे राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे यांच्या टेंभूर्णी येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगाम शुभारंभ कार्यक्रमासाठी अजित पवार येणार आहेत. मात्र मराठा आंदोलकांनी त्यांच्या दौऱ्याला विरोध केलाय.
दरम्यान शरद पवार हे पंढरपूर येथे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघातील राजकीय स्थिती जाणून घेणार होते. त्यासाठी पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांना बोलवले होते. या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. शिवाय पंढरपूर शहरात वातावरण निर्मिती करण्यासाठी शरद पवारांच्या स्वागताचे ठिकठिकाणी मोठमोठे बॅनर लावण्यात आले होते, मात्र हा आजचा दौरा रद्द करून पुढे ढकलण्यात आला आहे.