घाटकोपर दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला; आत्तापर्यंत 16 जणांचा मृत्यू, तर अनेकजण जखमी

मुंबईतील घाटकोपर येथे सोमवारी जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यातच घाटकोपर परिसरात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे पेट्रोल पंपावरील लोखंडी होर्डिंग (Ghatkopar Hoarding Collapse) खाली कोसळलं.

    मुंबई : मुंबईतील घाटकोपर येथे सोमवारी जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यातच घाटकोपर परिसरात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे पेट्रोल पंपावरील लोखंडी होर्डिंग (Ghatkopar Hoarding Collapse) खाली कोसळलं. या दुर्घटनेत आत्तापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

    घाटकोपरच्या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला होता. मात्र, यामध्ये आणखी दोघांची वाढ झाली आहे. निवृत्त एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) व्यवस्थापक मनोज चान्सोरिया (वय 60) आणि त्यांची पत्नी अनिता (वय 59) असे मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत. बचाव पथकाच्या जवानांनी या दोघांचेही मृतदेह बाहेर काढले आहेत.

    पेट्रोल पंपावर मोठमोठे होर्डिंग पडल्यानंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 100 जणांमध्ये त्यांचा समावेश होता. आतार्पंयत 16 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी साडेतीन चारच्या सुमारास घाटकोपर परिसरातील जिमखान्याजवळ हा अपघात झाला.

    वादळी वाऱ्यानं घाटकोपरच्या समता कॉलनीतील पेट्रोल पंपावर भलमोठं होर्डिंग कोसळलं. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली. तात्काळ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल ,अग्निशमन दल आणि पोलिसांची पथके तात्काळ मदत देण्यासाठी घटनास्थळी रवाना झाली. सध्या बचाव पथक थांबवल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.