…म्हणून कामगार संघटनेने बार्शीत केले भीक मांगो आंदोलन

कामगारांना वेठीस धरून नगरपालिकेच्या प्रशासनाकडून बिले काढण्याचा प्रयत्न ठेकेदार करत आहेत. तसेच नगरपालिकेचे अधिकारीही यात लक्ष घालत नाहीत. हे वेळीच बंद झाले पाहिजे. यासाठी सक्षम ठेकेदाराची नियुक्ती करावी.

    बार्शी / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : बार्शी नगरपरिषदेच्या (Barshi Nagar Parishad) कंत्राटी कामगारांचा थकीत पगार देण्याची मागणी केली असता नगरपरिषद मला कामाचे बिल देत नाही. त्यामुळे कामगारांचा पगार देता येत नाही, असे व्ही. डी. के. या ठेकेदाराचे म्हणणे आहे. या ठेकेदाराने पगार करण्यास असमर्थता दर्शवल्याने नागरिकांकडून भीक मागून ठेकेदाराला पैसे देण्यासाठी नगरपालिकेसमोर भीक मांगो आंदोलन करण्यात आले.

    कामगारांना वेठीस धरून नगरपालिकेच्या प्रशासनाकडून बिले काढण्याचा प्रयत्न ठेकेदार करत आहेत. तसेच नगरपालिकेचे अधिकारीही यात लक्ष घालत नाहीत. हे वेळीच बंद झाले पाहिजे. यासाठी सक्षम ठेकेदाराची नियुक्ती करावी. तसेच बार्शीकर नागरिक घरपट्टीतून प्रतिवर्षी अधिकचा भुर्दंड भरत असताना सुद्धा नागरिकांकडून भीक मागणे योग्य नसल्याची भावनाही यावेळी व्यक्त करण्यात आली.

    आंदोलनास मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील यांनी भेट दिली व कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. या आंदोलनात अजित कांबळे, मक्रोज बोकेफोडे, अतुल पेटाडे, संभाजी ब्रिगेडचे आनंद काशीद, वंचितचे शोएब सय्यद आदी कार्यकर्ते उपस्थित होते.