कामगार संघटनांच्या बंदमुळे मार्केट यार्डात शुकशुकाट; कोट्यवधींचे व्यवहार ठप्प

विविध मागण्यांसाठी श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील कामगार संघटनांनी साेमवारी (दि. २६) बंद पाळला. बंदमुळे मार्केट यार्डात शुकशुकाट हाेता. तसेच या बंदमुळे काेट्यावधी रुपयांची उलाढाल मंदावली.

  पुणे : माथाडी कायद्याची राज्यभरात काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, तसेच बाजार समितीचे केंद्रीकरण करणारे २०१८ चे विधेयक (राष्ट्रीय दर्जा बाजार समिती बनविणे) मागे घेण्यात यावे, यासह विविध मागण्यांसाठी श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील कामगार संघटनांनी साेमवारी (दि. २६) बंद पाळला. बंदमुळे मार्केट यार्डात शुकशुकाट हाेता. तसेच या बंदमुळे काेट्यावधी रुपयांची उलाढाल मंदावली.

  कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यातील सुधारणा, माथाडी कायद्यातील सुधारणांसह इतर मागण्यांकरीता राज्यभरातील कामगार संघटनांनी सोमवारी बंद पाळला. या बंदमध्ये पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सर्व कामगार संघटना सहभागी झाल्या हाेत्या. या बंदमध्ये श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील कामगार संघटना सहभागी झाल्या होत्या, अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार युनियनचे अध्यक्ष संतोष नांगरे यांनी दिली.

  माथाडी कायदा मोडीत काढण्यासाठी माथाडी विधेयक मांडण्यात आलेले आहे. संबंधित विधेयक मागे घेण्यात यावे. माथाडी मंडळात कामगारांच्या मुलांना प्राधान्याने नोकरी द्यावी, तसेच लोकशाही पद्धतीने व्यवस्थित बाजार समित्या सुरू आहेत त्यांचे केंद्रीकरण करण्याची गरज नसल्याचे कामगार संघटनांकडून दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

  गुलटेकडी मार्केट यार्ड येथील हमाल भवन पासून हमाल पंचायतीच्या वतीने दुचाकी मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा पुढे, पं नेहरू रस्त्याने डायस प्लॉट, सेवन लव्हज चौक, लाकूड बाजार, लोखंड बाजार ,एडी कॅम्प चौक, के एम हॉस्पिटल चौक, मालधक्का चौक, ससून मार्गे जिल्हाधिकारी कचेरी येथे आला. तेथे निदर्शने करण्यात आली आणि सभा झाली. यावेळी अंगभरती कष्टकरी संघर्ष समितीचे निमंत्रक नितीन पवार यांनी मार्गदर्शन केले. तसेच निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवेदन दिले.

  शिष्टमंडळात संदीप व सुभाष मारणे,विष्णू गरजे , रणजीत परदेशी , गाेरख मेंगडे, माेहन चिंचकर आदींचा समावेश होता. सरकारने प्रस्तावित दुरुस्त्या मागे न घेतल्यास लढ्याची तीव्रता वाढवण्याचा निर्णय यावेळेस जाहीर करण्यात आला.

  काय आहेत मागण्या ?

  माथाडी कायद्यातील प्रस्तावित बदल रद्द करा, बाजार समितीचे केंद्रीकरण करू नका, बाजार समित्यावर हमालांचे प्रतिनिधित्व कायम ठेवा, माथाडी कायद्याचे सार्वत्रिकीकरण करा, माथाडी मंडळात कर्मचारी भरती झालीच पाहिजे अशा विविध मागण्या कामगार संघटनांच्या आहेत.

  शेतमालाची आवक नाही

  स्थानिक भागातून समितीच्या बाजारात शेतमालाची आवक झाली नाही. परराज्यातील शेतीमालाची आवक सोमवारी आवक झाली. तसेच किराणा भुसार मालाच्या बाजारातील उलाढालही मंदावली हाेती. परराज्यातून माल घेऊन आलेल्या गाड्या बाजार आवारातच उभ्या राहील्या हाेत्या. त्या मंगळवारी खाली हाेण्याची शक्यता आहेत.