
जिल्ह्यासह कुरखेडा तालुक्यात सतत पावसाने हजेरी लावली. यामुळे तालुक्यातील नद्या, नाले दुथडी भरून वाहत असतांनाच दरवर्षीप्रमाणे सती नदीला यंदाही पूर आला. सदर पुरपरिस्थीतीमुळे कढोली परिसरातील अनेक शेतक-यांच्या शेतजमिनी पाण्याखाली गेल्या आहेत. परिणामी या शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले असून या शेतक-यांवर दुबार-तिबार पेरणीचे संकट ओढावले आहे.
गडचिरोली : जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्या, नाले, दुथडी भरुन वाहत आहेत. अशातच कुरखेडा तालुक्यातील सती नदीवर पूर (Flood on Sati river in Kurkheda taluka) परिस्थिती ओढवल्याने मंगळवारी पहाटेपासून या मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली. यामुळे कढोली – वैरागड – आरमोरी (Kadholi – Vairagad – Armory) मार्गावरील वाहतूक काही तास ठप्प पडली होती. काही तासानंतर पूर ओसरल्याने सकाळी ११ वाजेनंतर या मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरु झाली.
सोमवारी मध्यरात्रीपासून जिल्ह्यासह कुरखेडा तालुक्यात सतत पावसाने हजेरी लावली. या संततधारेमुळे तालुक्यातील नद्या, नाले दुथडी भरून वाहत असतांनाच दरवर्षीप्रमाणे सती नदीला यंदाही पूर आला. या पुरपरिस्थितीमुळे पहाटे ४ वाजतापासून या मार्गावरील वाहतूक ठप्प पडली होती. पूर बघण्यासाठी या परिसरातील नागरिकांनी नदी पुलावर एकच गर्दी केली, असतांना कढोली – वैरागड – आरमोरी मार्गे जाणारी अनेक वाहने अडकून पडली. अनेक वाहनांनी परतीचा प्रवास करीत उराडी – देलनवाडी – वैरागड गाठीत आरमोरीकडे प्रस्थान केले. तब्बल ६ तासानंतर पुराचे पाणी ओसरल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरु झाली. सद्यस्थितीत सदर मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरु असली तरी संततधार पावसामुळे सती नदीला पुन्हा येण्याची शक्यता कायम आहे.
शेतात शिरले पुराचे पाणी
मागील चोवीस तासापासून सुरु असलेल्या सतत पावसामुळे नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. परिणामी नदी काठालगत असलेल्या सखल भागात पावसाचे पाणी शिरले आहे. सदर पुरपरिस्थीतीमुळे कढोली परिसरातील अनेक शेतक-यांच्या शेतजमिनी पाण्याखाली गेल्या आहेत. परिणामी या शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले असून या शेतक-यांवर दुबार-तिबार पेरणीचे संकट ओढावले आहे.