कराड तालुक्यात रोखली वाहतूक ; ऊस दरासाठी शेतकरी संघटनांकडून चक्काजाम

गत वर्षी तुटलेल्या उसाला ४०० रुपये दुसरा हप्ता मिळावा, चालू ऊसाला ३५०० रूपये पहिली उचल मिळावी, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाची धग आजही कायम आहे. रविवारी (दि‌. १९) पाचवड फाटा (काले ) व उंब्रज-चाफळ रोड (उंब्रज) येथे स्वाभिमानी व बळीराजा शेतकरी संघटनेच्यावतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

  कराड : गत वर्षी तुटलेल्या उसाला ४०० रुपये दुसरा हप्ता मिळावा, चालू ऊसाला ३५०० रूपये पहिली उचल मिळावी, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाची धग आजही कायम आहे. रविवारी (दि‌. १९) पाचवड फाटा (काले ) व उंब्रज-चाफळ रोड (उंब्रज) येथे स्वाभिमानी व बळीराजा शेतकरी संघटनेच्यावतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत ऊस आंदोलनाचा तोडगा निघत नाही, तोपर्यंत वाहतूक सोडणार नाही, अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मांडली. यामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती.

  बळीराजा शेतकरी संघटनेने या आंदोलनास पाठिंबा दिला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हा अध्यक्ष देवानंद पाटील, कराड तालुकाध्यक्ष बापुसाहेब साळुंखे, जिल्हा उपाध्यक्ष उत्तम साळुंखे, तालुका अध्यक्ष रामचंद्र साळुंखे, दादासाहेब यादव, प्रमोद जगदाळे, सतीश यादव महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव, जिल्हाध्यक्ष गणेश शेवाळे यांच्यसह शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कारखानदाराच्या दबावा पुढे स्वाभिमानी शेतकरी संघटना कदापि झुकणार नाही, अशा घोषणा देण्यात आल्या. कराड ग्रामीण पोलिस निरीक्षक विजय पाटील, उंब्रज पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक वरोटे यांनी आंदोलनामुळे पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

  पोलिसांनी केली आंदोलकांची धरपकड
  पोलिसांनी बळाचा वापर करून ही पाचवड फाटा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना व बळीराजा शेतकरी संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांना, उंब्रज पोलिसांनी उंब्रज येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस गाठत घालून पोलीस ठाण्यात नेले. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त दिवसभर तैनात ठेवण्यात आला आहे.

  कारखानदारांच्या गुंडांना दिसेल तिथेच चोप
  कारखाना प्रशासन ऊसदर जाहीर करण्यास टाळाटाळ करत आहेत. तर दुसरीकडे शेतकरी संघटनांचे शांततेने केलेले आंदोलन पाळलेल्या गुंडाकडून मोडीत काढण्याचा प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्याच्या दृष्टीने पुढील काळ घातक ठरणार आहे. अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना स्वाभिमानी शेतकरी संघटना दिसेल तिथे चोप देणार आहे.-  – देवानंद पाटील, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना.