महामार्गावर वाहतूक काेडी कायम! मलकापूर-नांदलापूर रस्ता बनला धोकादायक

आशियाई महामार्गाचे सहापदरीचे काम कराड जवळ सुरू आहे. मात्र, वाहतूक सुरळीत रहावी म्हणून केल्या जाणाऱ्‍या उपाययोजनांमध्ये प्रचंड त्रुटी राहिल्या आहेत. त्याचा परिणाम वाहतूक कोंडीवर होत असून पर्यायी रस्ता म्हणून केलेला मलकापूर-नांदलापूर रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे.

  कराड : आशियाई महामार्गाचे सहापदरीचे काम कराड जवळ सुरू आहे. मात्र, वाहतूक सुरळीत रहावी म्हणून केल्या जाणाऱ्‍या उपाययोजनांमध्ये प्रचंड त्रुटी राहिल्या आहेत. त्याचा परिणाम वाहतूक कोंडीवर होत असून पर्यायी रस्ता म्हणून केलेला मलकापूर-नांदलापूर रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. हा रस्ता अरूंद आहे. शिवाय नाल्याची झाकणे रस्त्याच्यावर असल्याने रात्री चालकांना दिसत नसल्याने अपघाताच्या घटना घडू लागल्या आहेत.

  सहापदरी अंतर्गत कोल्हापूर नाका ते वाठार दरम्यान रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू आहे. कराड-कोल्हापूर नाक्यावरील उड्डाणपूल पाडला आहे. आता ढेबेवाडी फाट्यावरील उड्डाणपूल पाडण्याचे काम सुरू आहे. कोल्हापूर नाक्यावरील सर्व्हिस रस्ते वाढविण्यात आल्याने तेथील वाहतूक कोंडी फुटली आहे. मात्र ढेबेवाडी फाटा ते पाचवड फाटा दरम्यान वाहतूक समस्या कठिण झाली आहे.

  चेंबर दिसत नसल्याने अपघाताला निमंत्रण
  कराड मार्केट यार्ड, बैल बाजार रोड, मलकापूर ते नांदलापूर असा पर्यायी रस्ता केला असला तरी मलकापूर ते नांदलापूर दरम्यान केलेला रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे. हा रस्ता अरूंद आहे. शिवाय रस्त्यात ठिकठिकाणी ड्रेनेजची झाकणे वर आली आहेत. रस्त्याकडेला फूट दोन फुटावर काही ठिकाणी ड्रेनेजचे चेंबर आहेत. रात्रीच्या सुमारास ते दिसत नसल्याने वाहने त्यावर आदळून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

  गतीरोधकमुळे वाहनांची आदळआपट
  दोन ठिकाणी तर काही चेंबर रस्त्यात मध्येच आहेत. त्यावर वाहने आदळत आहेत. त्यावर उपाय म्हणून ज्या ठिकाणी चेंबर आहेत, तेथे गतीरोधक बनविण्यात आले आहेत. ते का बनविले आहेत या बाबत संदिग्धता आहे. रात्रीच्या सुमारास या गतीरोधकमुळे वाहनांची आदळआपट होत आहे.