दिवसाढवळ्या गर्दीच्या ठिकाणी चिरीमिरी घेणाऱ्या वाहतूक पोलिसावर निलंबनाची कारवाई; वाहतूक शाखेने व्हायरल व्हिडीओची घेतली दखल

  पुणे : पुणे शहरातील गजबजलेले ठिकाण असलेल्या महावीर चौकात कर्तव्यावर असताना चिरीमीरी घेणाऱ्या वाहतूक पोलीसचा व्हिडीओ दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Video Viral On Social Media) झाला होता. या व्हिडीओची दखल घेऊन चिरीमीरी घेणाऱ्या लष्कर वाहतूक विभागातील पोलीस हवालदार विजय मेवालाल कनोजिया यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार (DCP Rohidas Pawar) यांनी ही कारवाई केली आहे.

  दंडात्मक कारवाई न करता चिरीमीरी घेतानाचा व्हिडीओ

  शनिवारी (दि.30 मार्च) रोजी पोलीस हवालदार विजय कनोजिया महावीर चौकात (mahavir chowk) कर्तव्यावर होते. दुपारी दीडच्या सुमारास एक दुचाकी कोहीनुर हॉटेल कॅम्पच्या (hotel kohinoor camp pune) बाजूने महावीर चौकाकडे आली. त्यावेळी दुचाकीला फॅन्सी नंबर प्लेट असल्याने विजय कनोजिया यांनी दुचाकी आडवली. कनोजिया यांनी दुचाकीस्वारावर दंडात्मक कारवाई न करता त्याच्याकडून चिरीमीरी घेऊन त्याला सोडून दिले. याचा व्हिडीओ कोणीतरी बनवून ‘मार्च एन्ड एम जी रोड’ (March End MG Road) असे कॅप्शन देऊन सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता.

  व्हायरल क्लीपमुळे पोलीस दलाची प्रतीमा मलीन
  विजय कनोजिया यांनी दुचाकीस्वार यांच्या वाहनावर कायदेशीर कारवाई न करता सोडून दिले.
  तसेच त्यांचे संशयास्पद वर्तनाच्या व्हायरल क्लीपमुळे पोलीस दलाची प्रतीमा मलीन झाली. या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन वरिष्ठ पोलिसाकडून कनोजिया यांची चौकशी करण्यात आली. कर्तव्यात कसूरी केल्याने आणि पोलिसांची प्रतिमा मलिन केल्यामुळे कनोजिया यांना निलंबित केले आहे. निलंबनाचे आदेश सोमवारी (दि.1) काढण्यात आले.

  निलंबन काळात विजय कनोजिया यांना कोणत्याही प्रकारची खासगी नोकरी किंवा व्यवसाय करता येणार नाही. याबाबतचे प्रमाणपत्र देऊन निर्वाह भत्त्याची रक्कम स्वीकारावी लागेल, असे आदेशात नमूद केले आहे.

  तसेच निलंबन काळात मुख्यालय सोडून जायचे असेल तर पोलीस उप आयुक्त मुख्यालय यांची परवानगी घ्यावी लागेल. तसेच निलंबनाच्या कालावधीत दररोज राखीव पोलीस निरीक्षक, पोलीस मुख्यालय पुणे शहर यांच्याकडे हजेरी द्यावी लागेल, असे आदेशात नमूद केले आहे.