भूजल पातळी खालावलेल्या जिल्ह्यातील ९७ गावांना प्रशिक्षण; अटल भूजल योजनेचे वर्ग झाले सुरू

  सातारा : सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात दमदार तर पूर्व भागात कमी अधिक पाऊस पडतो. जिल्ह्यातील तालुकानिहाय माण ३५, खटाव ३१, वाई ३०, महाबळेश्वर १ अशा ९७ गावाची भूजल पातळी चांगलीच खालावलेली आहे. याच गावात लोकसहभागातून भूगर्भातील पाणी पातळी उंचाविण्यासाठी योग्य तांत्रिक पध्दतीचा वापर गावकऱ्यांनी करण्याची वेळ आली आहे.

  उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून भविष्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी अटल भूजल योजनेंतर्गत ९७ गावात दर १५ दिवसांनी जाऊन एका विषयावर तज्ञ मार्गदर्शकांची टीमकडून प्रशिक्षण देत आहे. याच प्रशिक्षणातून मिळालेले ज्ञान गावाच्या हद्दीतील भूगर्भातील पाणी पातळी उंचाविण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास सातारा जिल्ह्याचे वरिष्ठ भूवैज्ञानिक अधिकारी प्रकाश बेडसे यांनी व्यक्त केला आहे.

  केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानूसार देशातील भूगर्भातील पाणी पातळी खालावलेल्या प्रत्येक गावात भूवैज्ञानिक सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाकडून अटल भूजल योजनेंतर्गत अभ्यासपूर्ण उपचार पद्धतीचा अवलंब करावा, यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत.

  सध्या याबाबत गावस्तरावर जाऊन तज्ञ मार्गदर्शकांकडून प्रशिक्षण दिले जात आहे.यामध्ये जिल्ह्यातील अती पर्जन्यमान असणाऱ्या वाई तालुक्यातील ३० आणि महाबळेश्वर तालुक्यातील १ गावाचा समावेश आहे. तर कमी पर्जन्यमान असणाऱ्या माण ३५ आणि खटाव तालुक्यातील ३१ गावे आहेत. आजपर्यंत मोठ्या प्रमाणावर जलसंधारण, वृक्षलागवड करणाऱ्या गावांचा ही समावेश आहे.

  याच गावांनी आता लोकसहभागातून पाणी पातळी उंचावण्यासाठी सर्वोत्तम योगदान देण्याची गरज आहे. याबाबत गावातील नागरिकांना अधिक सक्षम करण्यासाठी अटल भूजल योजनेंतर्गत फेब्रुवारी अखेरपर्यंत दर १५ दिवसांनी १ प्रशिक्षण दिले जात आहे. सातारा जिल्ह्यात रयत शिक्षण संस्थेचे वर्ये-सातारा येथील पंचायत राज प्रशिक्षण केंद्राची टीम ग्रामस्तरावर जाऊन प्रशिक्षण घेत आहे. या योजनेसाठी जिल्ह्यात भागीदार संस्था असणाऱ्या श्री मनवेल बारदेस्कर एज्युकेशन सोसायटीच्या तज्ञांची सपोर्ट टीम काम करत आहेत.

  लोकसहभागातून या ९७ गावांचा जलसुरक्षा आराखडा तयार केला असून प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यासाठी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडून प्रयत्न केला जात आहे. जलसुरक्षा आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी सध्या सुरू असलेली प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

  सातारा जिल्हा भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून यासाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रभावी प्रयत्न केले जात असल्याचे वरिष्ठ भूवैज्ञानिक अधिकारी प्रकाश बेडसे यांनी सांगितले.

  प्रभावी मार्गदर्शक टीम

  रयत शिक्षण संस्थेच्या पंचायत राज प्रशिक्षण केंद्राचे प्रविण प्रशिक्षकांना यशदा -पुणेकडून अटल भूजल योजनेच्या वेगवेगळ्या तांत्रिक विषयावर परिपूर्ण प्रशिक्षण दिले आहे.यात दिव्यराज बनसोडे,अमर लोखंडे, मोहनराव लाड, रघूनाथ जगताप, संदेश कारंडे, गजानन पिंपळे, वैभव जगदाळे, सचिन शेवाळे या अनुभवी तज्ञ असून हे सर्व जण जिल्ह्यात मार्गदर्शन करणार आहेत.

  – विजय जाधव, प्राचार्य, पंचायत राज प्रशिक्षण केंद्र.