Pune Drugs Connection

  पुणे : पुण्यातून उघडकीस आलेले साडेतीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात पुणे पोलिसांनी आता आरोपींना विचारपूस सुरू केली असून, आरोपी ड्रग्जच्या पैश्यांची हवालामार्फत देवाण-घेवाण करत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. त्यासोबतच ड्रग्जप्रकरणातील मुख्य आरोपी हे व्हीपीएन (व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क सिस्टीम) च्या माध्यमातून संपर्कात असल्याचे दिसत समोर आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

  १० जणांना अटक

  पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पुणे, कुरकुंभ, दिल्ली आणि सांगली शहरात छापेमारीकरिता १६७० किलो एमडी जप्त केले. आंतरराष्ट्रीय बाजारात साडे तीन हजार कोटीहून अधिक किंमत या ड्रग्जची आहे. या प्रकरणात पोलिसांनी वैभव माने, हैदर शेख, अजय करोसिया, भिमाजी साबळे, युवराज भुजबळ, दिवेश भुटिया, संदीप यादव, संदीप कुमार, आयुब मकानदार यांच्यासह १० जणांना अटक केली आहे.

  त्यांचीही रेडकॉर्नर नोटीस काढली

  ड्रग्जचा मास्टरमाईंड संदीप धुणे उर्फ सनी फरार झाला आहे. पोलिसांनी त्याच्याविरोधात रेडकॉर्नर नोटीस काढत शोध सुरू केला आहे. त्याच्यासोबत आणखी दोघे देखील रडावर असून, त्यांचीही रेडकॉर्नर नोटीस काढली आहे. यादरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपींकडे तपास सुरू करण्यात आला असून, पोलिसांनी केलेल्या तपासात मुख्य आरोपी हे व्हीपीएनच्या (व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क सिस्टीम) माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते. तपास यंत्रणापासून दूर राहण्यासाठी मोठे गुन्हेगार व्हीपीएनद्वारे संपर्क ठेवतात.

  हवालाच्या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरू

  तशाच पद्धतीने हे आरोपीदेखील संपर्कात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. दुसरीकडे मुख्य आरोपीच्या खाली काम करणारी फळी ही व्हाट्सएपद्वारे एकमेकांच्या संपर्कात होती. यासोबतच पैश्यांचे व्यवहार बँक खात्यामार्फत न करता ते हवाला मार्फत करत असल्याचाही संशय पोलिसांना आहे. यामुळे आता हवालाच्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.