solapur Zp

करमाळा तालुक्यातील कावळवाडी झेडपी शाळेतील "त्या' शिक्षकाची विनंती बदली सीईओ दिलीप स्वामी यांच्या मान्यतेने झाल्याचा शेरा प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी बदली आदेशावर मारला आहे. या नियमबाह्य बदली विरोधात बारा शिक्षक संघटनांनी स्वातंत्र्यदिनी जिल्हा परिषदेसमोर उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.

  सोलापूर : करमाळा तालुक्यातील कावळवाडी झेडपी शाळेतील “त्या’ शिक्षकाची विनंती बदली सीईओ दिलीप स्वामी यांच्या मान्यतेने झाल्याचा शेरा प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी बदली आदेशावर मारला आहे. या नियमबाह्य बदली विरोधात बारा शिक्षक संघटनांनी स्वातंत्र्यदिनी जिल्हा परिषदेसमोर उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.
  कावळवाडी झेडपी शाळेतील सर्वांत सेवाकनिष्ठ शिक्षक चंद्रहास शिंदे यांची प्रशासनाने नियमबाह्य केलेली बदली रद्द करण्याची मागणी जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटनेच्या समन्वय गुरुसेवा परिवारातर्फे तब्बल १२ शिक्षक संघटनेच्या जिल्हाध्यक्षांनी उप मुख्यकार्यकारी अधिकारी चंचल पाटील व शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. कावळवाडी शाळेत उपशिक्षकांची मंजूर पदे दोन असून कार्यरत उपशिक्षक ३ आहेत. पैकी १ उपशिक्षक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वेळापूर येथे २०१८ पासून विषय सहाय्यक पदी शिक्षण आयुक्त यांच्या आदेशानुसार प्रतिनियुक्तीने कार्यरत आहे. सद्यस्थितीत कावळवाडी येथे एकूण ४८ विद्यार्थी शिक्षण घेत असून २ शिक्षक तेथे अध्यापनाचे काम करत होते. परंतु सर्वांत सेवाकनिष्ठ असलेल्या शिंदे यांना अतिरिक्त ठरवून त्यांच्या विनंतीने नियमबाह्य बदली करण्यात आली आहे. आता कावळवाडी शाळेत ४८ विद्यार्थ्यांसाठी केवळ एकच शिक्षक कार्यरत आहे.मंजूर पदे २ व कार्यरत पदे ३ यांचा विचार करता अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन सेवाज्येष्ठतेने व्हायला हवे होते. परंतु हा नियम डावलून चक्क कावळवाडी शाळेतील सर्वांत सेवाकनिष्ठ शिक्षक शिंदे यांची जिल्हा परिषदेने बदली केल्याने जिल्ह्यातील सर्व शिक्षकांमध्ये संताप पसरला आहे.

  आमदाराचा पीए अडचणीत…

  एका आमदाराच्या पीएमार्फत ही फाईल हलविण्यात आल्याच्या चर्चेला जिल्हा परिषदेत आता जोर धरला आहे. याबाबत शिक्षक नेत्यांनी संबंधित आमदाराला विचारणा केल्याचेही आता सांगण्यात येत आहे. त्यामुळे “त्या’ आमदाराच्या अडचणीत वाढ झाल्याचे बोलले जात आहे. आपल्या पीएने परस्पर ही भानगड केल्याचे आमदाराच्या निदर्शनाला आले आहे. त्यामुळे या बदलेबाबत संबंधित आमदारांनी हात वर केल्याने प्रशासनाची मोठी अडचण झाल्याचे आता सांगितले जात आहे. दरम्यान एकत्रित आलेल्या सर्व शिक्षक संघटनांनी ही बदली त्वरित रद्द न केल्यास 15 ऑगस्टदिनी जिल्हा परिषदेत समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. सीईओ स्वामी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असल्याने या प्रकरणावर त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

  “त्या’ शिक्षकाचे स्पष्टीकरण
  “शिक्षकाची नियमबाह्य बदली’ या शिर्षकाखाली “नवराष्ट्र’ मध्ये बातमी प्रसारित होताच संबंधित शिक्षक शिंदे यांनी संपर्क साधून आपली बाजू मांडली आहे. प्रशासनानेच शाळेवर मला अतिरिक्त ठरवून बदली केल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.