प्रशासनाच्या निष्काळजीपणाची हद्द! बदली झालेला शिक्षक नवीन शाळेवर हजर ; प्रशासनाने दुसऱ्याच शिक्षकाला दिली नोटीस

"उलटा चोर कोतवालकोही डॉंटे' अशी एक म्हण आहे. या म्हणीचा प्रत्यय सध्या जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांना येताना दिसून येत आहे. बेकायदा बदली केलेल्या शिक्षकाला सोडून दुसऱ्याच शिक्षकाला शिक्षण विभागाने नोटीस बजावली आहे.

  सोलापूर : “उलटा चोर कोतवालकोही डॉंटे’ अशी एक म्हण आहे. या म्हणीचा प्रत्यय सध्या जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांना येताना दिसून येत आहे. बेकायदा बदली केलेल्या शिक्षकाला सोडून दुसऱ्याच शिक्षकाला शिक्षण विभागाने नोटीस बजावली आहे.

  करमाळा तालुक्यातील कावळवाडी जिल्हा परिषद शाळेतील उपशिक्षक चंद्रहास शिंदे यांची सोलापूर जिल्हा परिषदेने अचानक नियमबाह्य बदली केल्याने ही बदली सध्या जिल्ह्यातील सर्व शिक्षकांत चर्चेचा विषय झाली आहे. या अनुषंगाने शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या स्वाक्षरीने २८ जुलै रोजी पारित झालेल्या बदली आदेशात चंद्रहास शिंदे यांच्या पदस्थापनेत अनियमितता झाल्याचे नमूद करून त्यांना अंशतः बदलाने गुळसडी केंद्र देवळाली (ता.करमाळा) येथे नव्याने पदस्थापना देण्यात आली आहे. याच आदेशात संदर्भ क्र.१ व २ मधील शासन निर्णयामधील प्राप्त तरतुदीनुसार ही बदली केल्याचे नमूद केले आहे. परंतु संदर्भीय ग्रामविकास विभाग शासन निर्णय दि.७ एप्रिल २०२१ हा ऑनलाईन बदली प्रक्रियेत झालेल्या अनियमिततेबाबत असून संबंधित उपशिक्षक यांची कावळवाडी शाळेवर झालेली बदली ही अतिरिक्त शिक्षकांचे समुपदेशन प्रक्रियेद्वारे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या १ सप्टेंबर २०१८ रोजीच्या आदेशानुसार शिंदे यांच्या विनंतीवरून रीतसर झाली असून ते आजतागायत कावळवाडी शाळेवर नियमित मासिक पगारासह कार्यरत आहेत.तत्पूर्वी त्याच शाळेवरील उपशिक्षक कडू यांची जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत पूर्वीपासूनच शिक्षण आयुक्तांच्या लेखी आदेशाने प्रतिनियुक्ती झालेली आहे. त्यांच्या रिक्त जागी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शिंदे यांची तत्कालीन गटशिक्षणाधिकार्यांच्या शिफारसीनुसार व तालुका अंतर्गत समायोजनानुसार तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी कायमस्वरूपी बदली केली होती. आजमितीस चंद्रहास शिंदे यांची कावळवाडी शाळेवर एकूण ३ वर्षे ११ महिने इतकी सेवा झालेली आहे. ते प्राथमिक शिक्षकांच्या शासन निर्णयानुसार बदलीस अपात्र आहेत. तसेच यावर्षी शिक्षकांच्या बदल्या संपूर्ण राज्यातील कोणत्याच जिल्हा परिषदेत होण्याबाबतची कार्यवाही सुरू नसताना तसेच बदली प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाईन झालेली असताना कावळवाडी येथील शिक्षक चंद्रहास शिंदे यांच्या अचानक झालेल्या बदलीने जिल्ह्यातील शिक्षकांत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे शिक्षकांत या बदलीची वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.सद्यस्थितीत कावळवाडी जिल्हा परिषदेत एकूण ४८ विद्यार्थी शिक्षण घेत असून शिंदे यांच्या नियमबाह्य बदलीने केवळ उर्वरित एका शिक्षकास शाळा चालविण्याची कसरत करावी लागणार आहे.या निमित्ताने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. यापूर्वी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान व गुणवत्तेवर परिणाम होत असल्याने शिंदे यांची कावळवाडी शाळेवर बदली केली. मग आता अचानक गुळसडी येथे बदली का केली व कावळवाडी येथील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीची व गुणवत्तेची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न शिक्षकांमधून उपस्थित केला जात आहे.

  प्रशासनाकडून प्रस्ताव कसा?

  शिंदे आणि विनंती बदलीचा अर्ज थेट शिक्षणाधिकारी कार्यालयात दिला तिथून प्रशासन विभागाने यावर कसा अभिप्राय दिला? ही बाब स्पष्ट होत नाही. यापूर्वी ग्लोबल टीचर रणजीत डिसले अमेरिकेला जाण्यासाठी रजा मागायला आल्यावर शिक्षणाधिकारी लोहार यांनी तुम्हाला रजेची प्रोसिजर माहित नाही का? असा सवाल केला होता. त्यांना रजेचा अर्ज गटशिक्षणाधिकाऱ्याकडे देण्याबाबत सुनावले होते. मग शिंदे यांच्या बदलीचा विनंती अर्ज त्यांनी थेट कसा काय घेतला, असा आता सवाल उपस्थित केला जात आहे. एकाला एक न्याय तर दुसऱ्याला दुसराच न्याय अशी पद्धत प्राथमिक शिक्षण विभागात राबवली जात असल्याबद्दल शिक्षकांत संतापाची लाट पसरली आहे. सध्या शिक्षक सोसायटीची निवडणूक आहे. या अनुषंगाने या बदलीचे राजकारण केले जात असल्याचा आरोपही प्रशासनाकडून होत आहे.

  मागासवर्गीय शिक्षकांवर अन्याय

  बदली आदेश मिळाल्यावर शिंदे यांनी स्वतः शाळेच्या रजिस्टरमध्ये तशी नोंद करून नवीन ठिकाणी रुजू झाल्याचे सांगण्यात आले तर दुसरीकडून गटशिक्षणाधिकारी पाटील यांनी शिक्षक कांबळे यांना नोटीस बजावली आहे. बदली आदेशानंतर शिंदे यांना लवकर का सोडण्यात आले नाही असा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आल्याचे शिक्षकाकडून सांगण्यात येत आहे. “उलटा चोर कोतवाल को डांटे’ असा हा शिक्षण विभागाचा कारभार सुरू असल्याची संतप्त प्रतिक्रिया आता शिक्षकांतून उमटत आहे. प्रशासन शिंदे यांची बेकायदेशीर बदली कायम ठेवणार की मागासवर्गीय सेवाज्येष्ठ शिक्षक कांबळे यांना न्याय देणार याकडे आता सर्व शिक्षकांचे लक्ष लागले आहे.