
सडक अर्जूनी येथील ग्राहक योगेशचंद्र बडवाईक यांना ११ मे रोजी मोबाईलवर वीज बिल न भरल्यामुळे तुमचा वीज पुरवठा ९.३० वाजता खंडित करण्यात येईल असा मेसेज आला. परंतु, बडवाईक यांनी जागरूकता दाखवत माहिती दिली नाही. त्यामुळे, त्यांची फसवणूक टळली.
गोंदिया : मागील महिन्याचे वीजबिल अपडेट नसल्याच्या कारणावरून आज रात्री ९.३० वाजता वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. करिता ताबडतोब सोबत दिलेल्या वैयक्तिक मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा, असे बनावट ‘एसएमएस’ वैयक्तिक मोबाइल क्रमांकावरून नागरिकांना पाठविण्यात येत आहेत. या स्वरूपाचे बनावट संदेश पाठवून वीज ग्राहकांची फसवणूक करण्याचा प्रकार सडक अर्जूनी येथे उघडकीस आला असून या प्रकरणी महावितरणतर्फे पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर अशा प्रकारचे कोणतेही‘एसएमएस’व व्हॉट्स एप मेसेज महावितरणकडून पाठविण्यात येत नाही. त्यामुळे या मेसेजला प्रतिसाद वा उत्तर देऊ नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
अन्यथा या मधून आर्थिक फसवणूक होण्याची व्यक्त करण्यात आली असून महावितरणकडून केवळ मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या वीजग्राहकांनाच सिस्टीमद्वारे एसएमएस पाठविण्यात येत असून त्याचा सेंडर आयडी हा‘एमएसईडीसीएल’या नावाने असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे वैयक्तिक मोबाइल क्रमांकावरून प्राप्त झालेल्या महावितरणशी संबंधित एसएमएस किंवा अन्य मेसेज, कॉल तसेच पेमेंटच्या लिंकला नागरिकांनी प्रतिसाद किंवा कोणतेही उत्तर देऊ नये. केवळ महावितरणच्या अधिकृत वीज बिल भरणा केंद्र आणि अधिकृत ऑनलाइन पेमेंट गेटवेच्या माध्यमातूनच वीज बिल भरावे. मेसेजमध्ये नमूद केलेल्या कोणत्याही वैयक्तिक मोबाइल क्रमांकावर संपर्क साधू नये. असे आवाहन महावितरणच्या गोंदिया परिमंडळाकडून करण्यात आले आहे.
पोलिसात तक्रार दाखल
सडक अर्जूनी येथील ग्राहक योगेशचंद्र बडवाईक यांना ११ मे रोजी मोबाईलवर वीज बिल न भरल्यामुळे तुमचा वीज पुरवठा ९.३० वाजता खंडित करण्यात येईल असा मेसेज आला. परंतु, बडवाईक यांनी जागरूकता दाखवत माहिती दिली नाही. त्यामुळे, त्यांची फसवणूक टळली. मात्र, या प्रकरणी महावितरणच्या सडक अर्जुनी विभागाचे उप कार्यकारी अभियंता यांनी डूग्गीपार पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.