दिवाळीत २२ लाख प्रवाशांची वाहतूक; तब्बल ५१३ विशेष गाड्या सोडल्या

    पुणे : मध्य रेल्वेने यंदा प्रवाशांच्या सोयीसाठी तब्बल ५१३ विशेष गाड्या सोडल्या. गेल्या वर्षी २७० विशेष रेल्वे सोडल्या होत्या. विशेष रेल्वेमुळे सुमारे ७.५ लाख आरक्षित बर्थ प्रवाशांना उपलब्ध झाले. ५१३ विशेष रेल्वेतून सुमारे १३ लाख प्रवाशांची वाहतूक झाली तर शेड्यूल (कायमस्वरूपी) ३५० रेल्वेच्या माध्यमातून सुमारे ९ लाख प्रवाशांनी प्रवास केला. दोन्ही मिळून सुमारे २२ लाख प्रवाशांनी प्रवास केला.

    मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ व नागपूर या पाचही विभागांत रेल्वे प्रशासनाने ५१३ विशेष गाड्या सोडल्या. त्या आता तीन महिने धावतील. यातील ज्या रेल्वेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळेल, त्या कायमस्वरूपी करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासन घेऊ शकते. यातील सर्वाधिक गाड्या उत्तर भारतातील शहरांसाठी सोडल्या आहेत.

    मनमाड- भुसावळ सेक्शनमधून यातील बहुतांश रेल्वे धावत असल्याने कोंडी निर्माण झाली आहे. त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. मात्र गाड्यांची संख्या वाढल्याने प्रवाशांना घरी जाण्यासाठी सोय झाली आहे.

    प्रवाशांच्या सोयीसाठी यंदा मध्य रेल्वेने ५१३ विशेष गाड्या सोडल्या. त्यामुळे ज्या प्रवाशांना आरक्षित तिकीट मिळाले नाही, अशा प्रवाशांची सोय झाली आहे.

    - डॉ. शिवराज मानसपुरे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, मुंबई