लग्नासाठी काहीही! होणाऱ्या बायकोला भेटण्यासाठी चक्क थर्माकोलच्या नावेतून प्रवास

तो चक्क थर्मोकॉलच्या एका बॉक्स वरून 7 किलोमिटर अंतर कापत नवरदेव सासरवाडी संगम चिंचोली येथे सुखरूप पोहचला. तर, नवरदेवासह काही नातेवाईक असेच थर्मोकॉल वरून प्रवास करत पोहोचले.

    नांदेड : ‘उतावळा नवरदेव गुडघ्याला बाशिंग’ ही म्हण आपण ऐकली असेलच आता त्याचा प्रत्यय आलाय नांदेडमध्ये. नांदेडमध्ये पाऊस सुरू असल्याने वाहतुक बंद आहे. त्यामुळे इथं एका नवरदेवाने वधूच्यी गावी पोहेचण्यासाठी चक्क थर्मोकॅाल वरून ७ किलोमीटरचा धोकादायक प्रवास केला.

    हदगाव तालुक्यातील करोडी येथील शहाजी माधव राकडे यांचा विवाह नात्यातीलच उमरखेड तालुक्यातील संगम चिंचोली येथील गायत्री बालाजी गोंडाडे यांच्याशी ठरला होता. ठरल्या प्रमाणे 14 जुलै रोजी गुरूवारी सकाळी वधुकडे टिळा कुंकु पानवट्याचा आणि रात्री हळदीचा कार्यक्रम होता. मात्र, नांदेड जिल्ह्यात पाच दिवसापासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदी नाले ओसांडून वाहत आहेत, परिणामी अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. वाहतुकही बंद आहे. वधूचे गाव संगमचिंचोली हे पैनगंगानदी व कयाधू नदीचे संगम स्थान आहे. पण काही करून लग्नाला पोहचायचे असे नवरदेवाने ठरवले. त्यामुळे वधूच्या गावी जाण्यासाठी या नवरदेवाने एक शक्कल लढवली.

    तो चक्क थर्मोकॉलच्या एका बॉक्स वरून 7 किलोमिटर अंतर कापत नवरदेव सासरवाडी संगम चिंचोली येथे सुखरूप पोहचला. तर, नवरदेवासह काही नातेवाईक असेच थर्मोकॉल वरून प्रवास करत पोहोचले. गुरुवारी टिळ्याचा, कुंकू पानवाट्याचा कार्यक्रम संपन्न झाला. शुक्रवारी 15 जुलै रोजी लग्न आहे. पावसाने उघडीप दिली आणि रस्ता सुरू झाला तर वऱ्हाडी मंडळी वाहनाने जाऊ शकणार आहेत.